पुणे/ठाणे : करोना टाळेबंदीचे निर्बंध मागे घेण्यात आल्यानंतरही कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. तर, मुंबईतील बहुतांश उपाहारगृहे बंद असल्यामुळे कांद्याची मागणी निम्म्याने घटली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात कांद्याला सहा ते साडेआठ रुपये दर मिळत असून कांद्याचा वाहतूक खर्च करताना शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर बाजार समितीतील व्यवहार ठप्प झाले होते. निर्बंध शिथिल झाल्यानंतर बाजार आवारांचे काम सुरू झाले. त्यानंतर पुन्हा टाळेबंदी लागू झाली. जुलैत पुण्यातील मार्केटयार्ड दहा दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले. अशा परिस्थितीत कांद्याची आवक कमी होत चालली आहे.  शेतकरीही बाजारात कांदा विक्रीस पाठवित नाहीत. कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी थेट बांधावरूनच कांदा- विक्री करत आहेत. कांदा व्यापारी बांधावरच कांदा खरेदी करत असून तेथून परराज्यात कांदा पाठविला जात आहे, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी दिली.

येत्या सोमवारपासून नगर येथील बाजार समितीचे कामकाज पुन्हा बंद ठेवण्यात येणार आहे. बाजार आवाराचे कामकाज सुरळीत होत नसल्याने आवक कमी होत चालली आहे. सध्या मार्केटयार्डात दररोज फक्त २५ ट्रक कांदा विक्रीस पाठविला जात आहे. नेहमीच्या तुलनेत ही आवक कमी आहे. मागणीही बेताची आहे.

शेतकऱ्यांना करोनाची भीती

पुणे, मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. अनेक शेतकरी बांधावरच कांदाविक्रीस प्राधान्य देत आहे. मोठे व्यापारी बांधावरूनच कांदा खरेदी करत आहेत. सध्या घाऊक बाजारात दहा किलो कांद्याला प्रतवारीनुसार ६० ते ८५ रुपये असे दर मिळत आहेत. दीड वर्षांपूर्वी कांद्याला उच्चांकी दर मिळाले होते. आता मात्र कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात आहे.

मुंबईतही

’मुंबईकरांना एरवी दररोज १०० ते ११० गाडी कांदा लागतो. त्यापैकी ५० ते ६० गाडय़ा कांदा उपाहारगृहे खरेदी करतात.

’शहरातील टाळेबंदी शिथिल झाली असली तरी करोनाच्या भीतीमुळे मुंबईतील बहुतांश उपाहारगृहे बंद आहेत.

’कांद्याच्या मागणीचे हे प्रमाण अर्ध्यावर आल्याने दरांमध्ये घसरण झाल्याचे मुंबईतील घाऊक विक्रेत्यांनी सांगितले.