रस्त्यावर मिळणाऱ्या अन्नपदार्थाचा दर्जाबद्दल आशा बाळगण्यास जागा आहे. रस्त्यावर चहा-कॉफी, भेळपुरीसारखे पदार्थ विकणारे लहान विक्रेते देखील अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) नोंदणी करू लागले असून आतापर्यंत पुण्यात भेळपुरी-चाट व चायनीज विकणाऱ्या १,६३३ विक्रेत्यांनी एफडीएकडे नोंदणी केली आहे, तर ६ हजारांहून अधिक चहा-कॉफी विक्रेतेही नोंदणीकृत आहेत.
एफडीएचा परवाना घेणाऱ्या किंवा नोंदणी करणाऱ्या अन्न व्यावसायिकांना स्वच्छता पाळून अन्नपदार्थ बनवणे आणि कच्चे पदार्थ दर्जेदार वापरण्याबद्दलच्या सूचना दिल्या जातात. एफडीएच्या अन्न विभागाचे सहायक आयुक्त दिलीप संगत यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत पुण्यात २२,०५३ अन्न विक्रेत्यांनी एफडीएचा परवाना घेतला आहे, तर ५४,५४४ लहान अन्न विक्रेत्यांनी एफडीएकडे नोंदणी केली आहे. यात चहा-कॉफी आणि स्नॅक्स विकणाऱ्या ६,०८९ लहान अन्न विक्रेत्यांनी नोंदणी केली असून आणखी ४८८ मोठे चहा-कॉफी विक्रेते परवानाधारक आहेत. भेळपुरी, चाट आणि चायनीज विक्रेत्यांपैकी १,६३३ लहान विक्रेते नोंदणीकृत असून चाट व चायनीजच्या ३९ मोठय़ा विक्रेत्यांनी परवाने घेतले आहेत. भाजी-फळे विकणाऱ्या लहान विक्रेत्यांपैकी देखील ७,४७२ जणांनी नोंदणी केली आहे. पोळी-भाजी विकणारे ४६५ विक्रेते नोंदणीकृत आहेत, तर शीतपेये व आइस्क्रीम विकणाऱ्यांपैकी १,२१० लहान विक्रेत्यांनी नोंदणी केली आहे.
३१ मे पर्यंत एफडीकडे आवर्ती परतावा
न भरलेल्यांना दंड भरावा लागणार
परवानाधारक तसेच नोंदणीधारक असलेल्या सर्व अन्न व्यावसायिकांना एफडीएकडे दर वर्षी आवर्ती परतावा भरावा लागतो, तर दूध व दुग्धजन्य पदार्थाच्या व्यावसायिकांना सहामाही परतावा सादर करावा लागतो. हा परतावा ३१ मे अगोदर भरायचा होता. तरीही अजून १० ते २० टक्के अन्न व्यावसायिकांनी परतावा भरला नसल्याची माहिती दिलीप संगत यांनी दिली. ३१ मे नंतर परतावा न भरलेल्या अन्न व्यावसायिकांना प्रतिदिनी १०० रुपयांचा दंड आकारला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.