पुणे : देशातील ५८ टक्के नागरिकांची डास चावून झोपमोड होते. अपुरी झोप झाल्यामुळे नागरिकांना जास्त थकवा येऊन त्याचा परिणाम त्यांच्या उत्पादन क्षमतेवर होत आहे, असा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून समोर आला आहे. जागतिक हिवताप दिनाच्या निमित्ताने गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडच्या (जीसीपीएल) गुडनाइटने हे सर्वेक्षण केले आहे. संपूर्ण देशभरात हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये सार्वजनिक वर्तन, डासांमुळे होणारे रोग यांचे विश्लेषण केले गेले. या सर्वेक्षणामध्ये भारतातील उत्तर (मध्य भागातील राज्यांसह), दक्षिण, पश्चिम आणि पूर्व चार भागांचा समावेश करण्यात आला होता.
या सर्वेक्षणानुसार, ६२ टक्के पुरुष आणि ५३ टक्के स्त्रियांनी डासांमुळे झोपेत येणाऱ्या व्यत्ययाचा उत्पादनक्षमतेवर परिणाम होत असल्याचे सांगितले. हिवतापासारख्या डासांपासून होणाऱ्या आजारांमुळे दरवर्षी सुमारे १६ हजार कोटी रुपयांचा फटका अर्थव्यवस्थेला बसतो. त्यात ७५ टक्के खर्च हा नागरिकांच्या आजारपणामुळे कामाचे होणारे नुकसान असून उरलेला भाग उपचारांवरील खर्चाचा आहे. देशातील पश्चिम भागात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांचा डास चावून नागरिकांची झोपमोड होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. या राज्यांतील एकूण ६७ टक्के लोकांना डासांमुळे वारंवार झोपमोड होऊन त्याचा परिणाम उत्पादन क्षमतेवर होतो असे वाटते. दक्षिण भारतात हे प्रमाण ५७ टक्के आणि उत्तर व पूर्व भागात हे प्रमाण अनुक्रमे ५६ आणि ४९ टक्के आहे.
हेही वाचा…चर्चा तर होणारच! मावळमधून आणखी एका संजय वाघेरेंची एन्ट्री?; भरला अपक्ष उमेदवारी अर्ज
गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे (जीसीपीएल) प्रमुख विपणन अधिकारी अश्विन मूर्ती म्हणाले की, देशात दरवर्षी ४ कोटींपेक्षा जास्त नागरिकांना डासांमुळे हिवताप, डेंग्यू अशा आजारांचा सामना करावा लागतो. आजारामुळे शाळा, सामाजिक उपक्रम, काम, व्यावसायिक जबाबदारीतून त्यांना रजा घ्यावी लागते. यामुळे आरोग्य सेवांवरचा खर्च वाढतो तसेच उत्पादन क्षमता कमी होते. भारतीय अर्थव्यवस्थेची उत्पादनक्षमता कायम राखण्यासाठी मनुष्यबळ निरोगी असणे महत्त्वाचे आहे. यावरचा चांगला उपाय म्हणजे डासांमुळे होणाऱ्या आजारांचे वाढते प्रमाण रोखणे.
हेही वाचा…शिवाजी आढळराव पाटील हे डमी उमेदवार; अमोल कोल्हेंचा पुन्हा टोला
डासांमध्ये जीवघेण्या रोगांचा प्रसार करण्याची क्षमता असते. डासांमुळे डेंग्यू, हिवतापासारखे भीषण आजार पसरतात. कीटकजन्य आजारांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते व इतर आजारांना बळी पडण्याची शक्यता वाढते. यामुळे डासांमुळे होणाऱ्या आजारांपासून स्वतःचे संरक्षण करावे. – डॉ. कीर्ती सबनीस, संसर्गजन्य रोगतज्ज्ञ