अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढवण्याचा निर्णय महिला व बालकल्याण विभागाने घेतला असून मानधनवाढीचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी अर्थ विभागाकडे पाठवला आहे, अशी माहिती महिला व बालकल्याणमंत्री वर्षां गायकवाड यांनी शनिवारी दिली. महापालिकेच्या समूह संघटिकांचे मानधन वाढवण्याबाबत शासन निश्चितपणे प्रयत्न करेल, असेही त्या म्हणाल्या.
महापालिकेतर्फे आयोजित महिला महोत्सवाचे उद्घाटन गायकवाड यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या. महापौर चंचला कोद्रे, खासदार वंदना चव्हाण, सुरेश कलमाडी, आमदार माधुरी मिसाळ, गिरीश बापट, मोहन जोशी, विनायक निम्हण, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे, उपमहापौर बंडू गायकवाड, महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्ष वैशाली मराठे, उपाध्यक्ष शारदा ओरसे आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना खासदार वंदना चव्हाण यांनी राज्यातील अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडवण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या मानधनाबाबतही शासनाने ठोस निर्णय घ्यावेत अशी मागणी त्यांनी केली. या मागणीबाबत वर्षां गायकवाड यांनी सांगितले, की मानधनवाढीचा प्रस्ताव महिला व बालकल्याण विभागाने अंतिम मंजुरीसाठी अर्थ विभागाकडे पाठवला आहे. त्यांच्या मंजुरीनंतर मानधनवाढीचा निर्णय तातडीने अमलात येईल. महापालिकेच्या समूह संघटिकांचे मानधन वाढवण्याबाबतही शासन निश्चितपणे विचार करेल.
या महोत्सवाअंतर्गत गणेश कला क्रीडा मंच येथे रविवारी (९ फेब्रुवारी) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तू व खाद्यपदार्थाचेही स्टॉल मोठय़ा संख्येने लावण्यात आले आहेत. विविध विषयांवरील व्याख्याने तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांचे तसेच आदर्श बचत गटांचे सत्कार असे कार्यक्रम दिवसभर होणार असून समारोप समारंभात खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती असेल. हा महोत्सव रविवारी दिवसभर खुला आहे.