सुटय़ांचे दिवस नाटकांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय कागदावरच

शनिवार, रविवार तसेच सुटय़ांचे दिवस नाटकांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय पिंपरी महापालिकेने घेतला. मात्र, त्यादृष्टीने कोणतेच नियोजन न झाल्याने हे धोरण कागदावरच राहिले आहे. त्यामुळे नाटय़गृहांमध्ये नाटकांऐवजी स्नेहसंमेलने व इतर कार्यक्रमांचा भरणा अधिक दिसून येतो आहे. त्यामुळे नाटय़रसिकांमध्ये तीव्र नाराजीची भावना आहे.

पिंपरी महापालिकेची चार नाटय़गृहे आहेत. त्यातील संत तुकारामनगरचे आचार्य अत्रे रंगमंदिर दुरुस्तीसाठी कित्येक महिन्यांपासून बंद आहे. भोसरीच्या अंकुशराव लांडगे नाटय़गृहात नाटय़प्रयोग करण्यासाठी नाटक कंपन्या तसेच नाटय़निर्माते फारसे उत्सुक नाहीत. सांगवीतील निळूभाऊ फुले नाटय़गृहातील आसन क्षमता कमी असल्याने तेथे नाटय़प्रयोग करणे आर्थिकदृष्टय़ा परवडत नसल्याचे नाटक कंपन्यांकडून सांगण्यात येते. चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे नाटय़गृहाला सर्वाधिक मागणी आहे. सहा महिने हे नाटय़गृह दुरुस्तीसाठी बंद होते. नूतनीकरण झाल्यानंतर सुसज्ज नाटय़गृहाची मागणी आणखी वाढली आहे. तथापि, येथील नियोजनशून्य कारभारामुळे तारखांचे घोळ सुरू आहेत.

नाटकांसाठी तारखा दिल्या जात नाहीत, त्यामुळे चांगली नाटके शहरात होत नाहीत, अशी तक्रार सातत्याने होत आहे. आगामी तीन महिन्यांच्या तारीख वाटपानंतर ही तक्रार मोठय़ा प्रमाणात होत आहे. बहुतांश तारखा शाळांच्या स्नेहसंमेलनांसाठी देण्यात आलेल्या आहेत. सुटीच्या दिवशी नाटकांसाठी तारखा न देता इतर कार्यक्रमांसाठी देण्यात आल्या आहेत. राजकीय हस्तक्षेपातून दिलेल्या तारखा काढून घेण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. येथील कारभाराकडे कोणाचेच लक्ष नाही, असे दिसून येते.