पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील एका मजल्याला गुरुवारी सकाळी आग लागली. आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या रूबी अलकेअर या ह्रदयरोगाशी संबंधित विभागाला आग लागली. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून, आग आटोक्यात आणण्यात येत आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी रूबी अलकेअर या विभागातून धूर येऊ लागल्याचे तेथील कर्मचाऱ्यांना दिसले. यामुळे लगेचच या मजल्यावरील सर्व रुग्णांना इतर ठिकाणी हलविण्यात आले. त्याचबरोबर हा संपूर्ण मजला रिकामा करण्यात आला. धूराचे प्रमाण वाढू लागल्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी तेथील खिडक्यांच्या काचा फोडल्या आणि धूराला वाट मोकळी करून दिली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवण्यास सुरुवात केली.
रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील काही जागा रूबी अलकेअर या खासगी विभागाला देण्यात आली आहे. तिथेच शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळाली. कर्मचाऱ्यांनी योग्य वेळीच या घटनेचे गांभीर्य ओळखून हालचाली केल्यामुळे मोठा धोका टळल्याची माहिती मिळाली आहे. आग पूर्णपणे विझवण्यासाठी अग्निशमक दलाचे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.