राजकीय वादातून तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची घटना जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावरील सोमाटणे फाटा भागात घडली. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून एकाला अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.
प्रवीण रमेश शेडगे (वय २३, रा. सोमाटणे) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याचे समजू शकले नाही. योगीराज मुऱ्हे, दादा मुऱ्हे, दादा पोळके यांच्याविरुद्ध तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीड वर्षांपूर्वी सोमाटणे येथील ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. प्रवीणने निवडणुकीत मतदान केले नसल्याने आरोपी त्याच्यावर तेव्हापासून चिडून होते. गुरुवारी रात्री आरोपींनी प्रवीण याला मारहाण करून त्याच्यावर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर सोमाटणे फाटा भागात तणावाचे वातावरण होते. पोलीस निरीक्षक वसंत बाबर तपास करत आहेत.