राज्यात पोलिसांवरील हल्ल्याचे सत्र सुरुच आहे. पुण्यात गस्तीवर असलेल्या दोघा पोलिसांवर संशयित चोरट्यांनी एअरगनने गोळ्या झाडल्याची घटना घडली आहे. यात छर्रा छातीजवळ लागल्याने एक पोलीस जखमी झाला असून दुस-या पोलिसाला चोरट्यांनी मारहाण करुन पळ काढला.
पाषाणमधील सुस खिंड टेकडीवर चाकूचा धाक दाखवून लुबाडण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे चतुःश्रृंगी पोलिसांनी टेकडी परिसरातील गस्त वाढवली आहे.  शनिवारी रात्री पोलीस हवालदार बबन गुंड आणि पोलीस शिपाई अमर शेख हे गस्तीवर होते. यादरम्यान त्यांना ३ तरुण संशयास्पदरित्या फिरताना दिसले. पोलिसांनी त्या तिघांची चौकशीही केली. अंगझडती घेत असताना तिघा संशयित चोरट्यांनी पोलिसांना प्रतिकार केला. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता यातील एकाने एअरगनने पोलिसांवर गोळीबार करुन पळ काढला. छर्रा छातीच्या बरगडीजवळ लागल्याने एक पोलीस गंभीर जखमी झाला. तर दुस-या पोलिसाला मारहाण झाल्याने तेदेखील किरकोळ जखमी झाले. सध्या पोलीस या तिघा आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांवर हल्ला झाल्याचे वृत्त समजताच वरिष्ठ अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला.
मुंबईत विलास शिंदे या पोलीस कॉन्स्टेबलचा दुचाकीस्वाराच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. यानंतर कुर्ला आणि ठाण्यात वाहनचालकाने पोलिसांच्या अंगावर गाडी चढवून त्यांना जखमी केले होते. धुळ्यातही दोन गटात झालेल्या हाणामारीत एक पोलिस अधिकारी जखमी झाले होते. पोलिसांवरील हल्ले वाढल्याने गृहखात्यावर टीकेची झोड उठली आहे.