नायडू रुग्णालयाबद्दल कृतज्ञता

पुणे : दुबईहून परतलेल्या पुण्यातील दाम्पत्याला करोना विषाणू संसर्गाची लागण झाल्याच्या बातमीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील व्यक्तींचे लक्षही वेधले आणि भीतीही निर्माण केली. हे दाम्पत्य गुढी पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर संपूर्ण बरे होऊन घरी परतले आणि हा आजार बरा होतो, हा विश्वास देत राज्यातील रुग्णांना धीर दिला.

घरी परततानाच नायडू रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली!

दुबईहून परत येताना करोना विषाणू संसर्गाची लागण झालेल्या या दाम्पत्याच्या निकट सहवासात असलेली मुलगी देखील नायडू रुग्णालयात दाखल होती. मुलाला मात्र, कोणतीही लक्षणे नसल्यामुळे, तसेच त्याच्या चाचणीत करोनाचा संसर्ग न आढळल्यामुळे रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले होते. या दांपत्याने १४ दिवसांचे विलगीकरण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या दोन चाचण्या करण्यात आल्या. या दोन्ही चाचण्यांतून ते करोनामुक्त झाल्याचे दर्शवल्यानंतर रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांची घरी पाठवणी केली. रुग्णालय सोडताना, या दाम्पत्याने आपला अभिप्राय नायडू रुग्णालयाकडे नोंदवला.

हे दाम्पत्य म्हणाले, करोना विषाणू संसर्गाच्या जगभरातून येणाऱ्या बातम्या भीतिदायक होत्या. प्रत्यक्षात आम्हाला विषाणू संसर्ग आहे, हे जाणवण्यासाठीही काही शारीरिक त्रास झाला नाही. डॉक्टर, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी या सगळ्यांबरोबर आमच्या चहा-नाश्ता-जेवणाची सोय पाहणारे कर्मचारी देखील आमची प्रेमाने काळजी घेत होते. आम्ही बरे होणार हा विश्वास देत होते. त्यामुळे १४ दिवसांचे विलगीकरण सुसह्य़ झाले. रुग्णालयाने आम्हाला दिलेला धीर आज आम्ही राज्यातील इतर रुग्णांना देत आहोत. तुम्ही सगळे नक्की बरे होणार, असे दाम्पत्याने आपल्या अभिप्रायात म्हटले आहे.

इतर सर्व निरोगी नागरिकांनी सरकारचे निर्बंधपाळून घरी राहावे आणि स्वतचा करोनापासून बचाव करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.