पुण्याच्या जवळ ‘पाच लाखात घर’ अशी जाहिरात करून त्यात पंतप्रधान, मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांची छायाचित्रे वापरली असल्याने भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी या योजनेबाबत आक्षेप घेतला असून, ही योजना केंद्र किंवा राज्य शासनाने प्रस्तावित केली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान, ही जाहिरात करणाऱ्या संस्थेच्या प्रमुखांना त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पुण्यापासून जवळच्या परिसरामध्ये पाच लाखात घर देण्याचे आश्वासन असणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या असल्याने अनेकांनी या योजनेसाठी नोंदणी सुरू केली आहे. या जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट यांचे छायाचित्र वापरण्यात आले आहे. नोंदणीसाठी अर्ज भरून घेण्यात येत असून, त्यासाठी प्रत्येकी ११४५ रुपये अनामत रक्कम परत न देण्याच्या अटीवर घेतली जात आहे.
सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात या योजनेबाबत विविध शंका उपस्थित केल्या आहेत.
खासगी व्यावसायिकाच्या योजनेच्या जाहिरातीत पंतप्रधान, मुख्यमंत्री, पालकमंत्री यांची छायाचित्रे आहेत. या योजनेला रिअर इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटीची परवानगी आहे का, ही योजना खरोखरच शासनाने प्रस्तावित केली आहे का, असे प्रश्न उपस्थित करीत खासगी व्यावसायिकाकडून नेत्यांच्या नावाने आश्वासने, प्रलोभने दाखविली जात आहेत. त्यामुळे या बाबींची सत्यता पडताळण्याची आवश्यकता असल्याचे सोमय्या यांनी पत्रात म्हटले आहे.