पावसाळा सुरू झाला की ठिकठिकाणी वृक्षारोपण केले जाते, परंतु अनेकदा कोणती झाडे लावावीत या विषयी नागरिकांना माहिती नसते. तसेच रोपे लावल्यानंतर त्यांची पुरेशी काळजी न घेतली गेल्यास अनेक रोपे मरतात. या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न पुण्यातील एका संस्थेने केला असून त्यात आपल्या आवारात वृक्षारोपण करू इच्छिणाऱ्या सोसायटय़ांना ‘आपली सोसायटी आपले वृक्ष’ या उपक्रमाद्वारे मोफत मार्गदर्शन पुरवले जाणार आहे.

‘अलाईव्ह’ या संस्थेतर्फे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने (५ जून) हा उपक्रम सुरू केला जाणार आहे. संस्थेचे अध्यक्ष उमेश वाघेला यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘अनेक ठिकाणी अपुऱ्या माहितीमुळे विदेशी झाडे लावली जातात. या झाडांचा पक्ष्यांना व जैवविविधतेच्या दृष्टीने उपयोग नाही हे लोकांना माहीत नसते. तसेच एकाच प्रकारचे देशी वृक्ष मोठय़ा संख्येने लावले गेल्यास देखील जैवविविधता टिकत नाही. झाडे कोणती लावावीत हे सांगताना प्रथम प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे जमीन काळी माती आहे की मुरमाड जमीन हे पाहिले जाईल. मातीच्या प्रकारानुसार त्यात वृक्षारोपणासाठी कसे खड्डे घ्यावे लागतील हे ठरते. रोपे कुठून मिळवावीत याबाबतही सांगितले जाईल.’’

नागरिकांना यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, परंतु झाडे लावणे व जगवण्याची जबाबदारी त्या-त्या सोसायटीस घ्यावी लागेल, असेही त्यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी वाघेला यांना ९८८११०१५४१, अथवा निसर्ग अभ्यासक चैतन्य राजर्षी यांना ९९२२५०७३३० या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळवले आहे.