‘राष्ट्रीय शहरी आरोग्य कार्यक्रमा’अंतर्गत (एनयूएचएम) पालिकेचे सर्व दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये औषधे मोफत देण्यात येणार आहेत. कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा आजारांवरील औषधांचा यात प्राधान्याने समावेश असणार आहे.
पालिकेचे सहायक आयुक्त डॉ. संजीव वावरे यांनी ही माहिती दिली. कुटुंब कल्याण आयुक्त, आरोग्य खात्याचे सचिव आणि राज्यातील महापालिकांचे आरोग्य प्रमुख यांच्यात झालेल्या बैठकीत दोन आठवडय़ांपूर्वी हा निर्णय घेण्यात आला. डॉ. वावरे म्हणाले, ‘‘एनयूएचएमअंतर्गत पालिकेचे दवाखाने ‘प्रिस्क्रिप्शन फ्री’ व्हावेत आणि सर्व रुग्णांना दवाखान्यातच औषधे मोफत मिळावीत अशी ही संकल्पना आहे. यात सुमारे ४२५ औषधे रुग्णांना मोफत देण्यात येणार असून ही सर्व जेनेरिक औषधे असतील. पालिकेचे दवाखाने किंवा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल. औषधे मिळण्याबाबतची मागणी पालिकेने राज्य शासनाकडे नोंदवली असून पुढील तीन महिन्यांत योजनेची अंमलबजावणी सुरू होऊ शकेल.’’