वस्तू व सेवा करातील (जीएसटी) अटी, तरतुदी आणि किचकट संगणक प्रणालीला देशभरातील कर सल्लागार, व्यापारी, सनदी लेखापालांकडून विरोध करण्यात येत आहे. जीएसटीतील तरतुदींविरोधात येत्या शुक्रवारी (२९ जानेवारी) देशभरात निषेध आंदोलन करण्यात येणार असून, पुण्यात जीएसटी कार्यालयासमोर सकाळी दहा वाजता आंदोलन करण्यात येणार आहे.

ऑल इंडिया प्रोटेस्ट कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेंद्र सोनावणे यांनी सोमवारी ही माहिती दिली. पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार संघटनेचे अध्यक्ष विलास आहेरकर, राष्ट्रीय समन्वयक स्वप्नील मुनोत, गोविंद पटवर्धन, शरद सूर्यवंशी आदी या वेळी उपस्थित होते. सोनावणे म्हणाले, की गेल्या तीन ते पाच वर्षांत जीएसटीतील तरतुदी अधिक जाचक झाल्या आहेत. कर चुकवणाऱ्यांवर कर विभागाला कारवाई करता येत नसल्याने किचकट पूर्ततांचे ओझे करदात्यांवर लादण्यात आले आहे. त्यात प्रामाणिक व्यापारी भरडले जात आहेत. त्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.