यंदाच्या ख्रिसमसचे एक वेगळे वैशिष्टय़ असणार आहे, ते म्हणजे या दिवशी पौर्णिमा येत असून चंद्राच्या साक्षीने हा सण १९७७ नंतर प्रथमच साजरा होत आहे, आता यानंतर एकदम २०३४ या वर्षी ख्रिसमसच्या दिवशी पौर्णिमा असणार आहे, असे मुंबईच्या नेहरू तारांगणाचे संचालक अरविंद परांजपे यांनी सांगितले.
यंदाच्या डिसेंबरमध्ये ख्रिसमसची रात्र पूर्ण चंद्राच्या प्रकाशात न्हाऊन निघणार आहे हा वेगळा योग आहे. याला शीत पौर्णिमा असेही म्हणतात कारण ती थंडीच्या सुरुवातीला येत आहे, या वर्षांतील ही शेवटची पौर्णिमा आहे.
श्री. परांजपे यांनी सांगितले की, ख्रिसमला पौर्णिमा असणे हे तसे दुर्मीळ असण्याचे कारण म्हणजे ग्रेगरियन दिनदर्शिका ही सूर्यानुसार असते त्यामुळे सहसा तसे घडत नाही. याउलट भारतीय दिनदर्शिका ही चंद्रानुसार असल्याने आपल्याकडे कोजागरीला किंवा इतरही काही सणांना पूर्ण चंद्र असतो. यापुढे ख्रिसमसला पूर्ण चंद्र असण्याचा योग २०३४ मध्ये येणार आहे.  ख्रिसमसच्या या आगळ्यावेगळ्या पौर्णिमेच्या चांदण्याचा आनंद आताच्या २५ डिसेंबरला लुटता येणार आहे.
चंद्र हा आपला खगोलीय शेजारी आहे एवढेच नाही तर अशा वेगळ्या पौर्णिमेच्या वेळी त्याचे विशेषत्व जास्त जाणवते. चंद्राचा व पृथ्वीचा भूगर्भीय इतिहास हा एकमेकांशी निगडित आहे. त्यामुळे आपल्याला चंद्राविषयी आकर्षण असते व सणाच्या दिवशी चंद्राची साक्ष असणे ही जास्तच आनंददायी बाब ठरते. चंद्र नसता तर पृथ्वीचे अस्तित्व आतापेक्षा खूप वेगळे राहिले असते असे वैज्ञानिकांचे मत आहे. अमेरिकेचे ल्युनर रेकनसान्स ऑर्बिटर हे यान चंद्राच्या पृष्ठभागाचे २००९ पासून निरीक्षण करीत असून  चंद्राची नवीन माहिती मिळत आहे.