कात्रज उद्यानात गेल्या महिन्यात सुरू करण्यात आलेल्या फुलराणीला मोठा प्रतिसाद मिळाला असून फुलराणीतून फेरी मारण्यासाठी सध्या बच्चे कंपनीच्या आणि पालकांच्याही रांगा लागत आहेत. त्यामुळे फुलराणीचे उत्पन्नही तीन लाखांच्या घरात गेले आहे. गेल्या २२ दिवसात फुलराणीतून २२ हजार जणांनी सफर केली आहे. 
कात्रज येथील उद्यानात महापालिकेच्या वतीने फुलराणी सुरू करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात फुलराणीचे उद्घाटन झाल्यानंतर लगेचच ती सुरू देखील करण्यात आली. स्थानिक नगरसेवक वसंत मोरे यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या या फुलराणीला पहिल्यापासूनच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. फुलराणी ८ मे पासून धावू लागली असून आतापर्यंत २२ हजार जणांनी फुलराणीतून सफर केली आहे. महापालिकेला एका वर्षांला फुलराणीतून एक कोटींचे उत्पन्न मिळू शकते, असे नगरसेवक मोरे यांनी सांगितले.
कात्रज येथील फुलराणीच्या प्रकल्पाला एक कोटी ३२ लाख रुपये खर्च आला असून फुलराणीच्या रुळांची लांबी ४२७ मीटर आहे. फुलराणीला इंजिन आणि चार डबे आहेत आणि एकावेळी ६४ जण या गाडीतून फिरण्याचा आनंद घेऊ शकतील. फुलराणीच्या मार्गावर एक बोगदाही असून गेले वर्षभर फुलराणीचे काम सुरू होते. प्रौढांसाठी वीस आणि लहानांसाठी १० रुपये असा तिकीट दर ठेवण्यात आला आहे.