ग्रामीण पोलिसांची कारवाई; सोळा जणांना पकडले

ग्रामीण भागात कोंबडय़ाची झुंज लावली जाते. झुंजीवर जुगारदेखील खेळला जातो. जुगारावर कायद्याने बंदी असताना पुणे शहरापासून काही अंतरावर असलेल्या भूगावनजीक मुकाईवाडीतील एका हॉटेलमध्ये कोंबडय़ांच्या झुंजीवर जुगार खेळला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मुकाईवाडीतील निसर्ग हॉटेलवर छापा टाकून सोळा जणांना पकडले. या कारवाईत एक लाख पाच हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.

चांदणी चौकापासून दहा मिनिटांवर असलेल्या भूगावनजीक मुकाईवाडी आहे. या भागातील निसर्ग हॉटेलमध्ये कोंबडय़ांच्या झुंजीवर जुगार लावला जात असल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांना मिळाली होती. पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री हॉटेलवर छापा टाकला. या कारवाईत राजेश रई, प्रकाश पुजारी, विश्वनाथ शेट्टी, संदीप शेट्टी, वासू खरकेरा, रवींद्र सिंग, मकरंद घाडगे, सायन छेत्री, कुबेर अधिकारी, बाळकृष्ण इलवारी, दयानंद पुजारी, प्रसन्ना शेट्टी, अण्णा यांच्यासह सोळा जणांना ताब्यात घेण्यात आले.

प्राण्यांना क्रूरपणाची वागणूक देणे, तसेच जुगार खेळणे या कलमांखाली पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिली.

निसर्ग हॉटेलचे मालक प्रसन्न शेट्टी आणि व्यवस्थापक गंगाधर कोरायन यांच्याविरुद्ध परवाना नसताना विदेशी मद्याची विक्री केल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निसर्ग हॉटेलमधून ४१ मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

कोंबडय़ाची झुंज कशी खेळली जाते

गुन्हे शाखेने निसर्ग हॉटेलवर छापा टाकला. तेथे आठ ते दहा कोंबडे होते. या कोंबडय़ांना झुंज खेळण्याचे प्रशिक्षण दिले जाते. कोंबडय़ांच्या पायाला धारदार पाते (ब्लेड) बांधले जाते. कोंबडय़ांची झुंज सुरू झाल्यानंतर झुंज खेळणारे कोंबडे एकमेकांवर आक्रमण करतात. पायाला असलेल्या ब्लेडने हल्ला केल्यानंतर  प्रतिस्पर्धी कोंबडा जखमी होतो. कोंबडय़ांच्या झुंजीवर पैसे लावले जातात. झुंजीत विजयी झालेल्या कोंबडय़ावर पैसे लावणाऱ्याला दुप्पट-तिप्पट पैसे मिळतात.