गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती सार्वजनिक ट्रस्टतर्फे यंदाच्या गणेशोत्सवामध्ये जगातील सात आश्चर्यापैकी एक असलेले १२ व्या शतकातील वेरुळ येथील कैलास मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.
एकसंध दगडामध्ये खोदकाम केलेले वेरुळ येथील कैलास लेणे हे जगातील एकमेव स्थापत्य आहे. वरपासून खालपर्यंत खोदत आणलेल्या या मंदिरावर कोरण्यात आलेली वैशिष्टय़पूर्ण शिल्प अधिकाधिक प्रमाणात साकारण्याचा प्रयत्न असल्याची माहिती या देखाव्याचे कला दिग्दर्शक विवेक खटावकर यांनी दिली. ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली हिराबाग येथील महापालिका कोठीमध्ये २८ मे पासून यंदाच्या सजावटीच्या कामाची सुरुवात झाली आहे. ४० सुतार, पेंटिंगचे काम करणारे १५ कलाकार आणि फायबर ग्लासचे काम करणारे १६ कलाकार हा देखावा लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी गेल्या ४० दिवसांपासून काम करीत आहेत. १५ ऑगस्टपासून उत्सव मंडपामध्ये देखाव्याच्या उभारणीचे काम सुरू करून २५ ऑगस्टपर्यंत सजावटीचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे विवेक खटावकर यांनी सांगितले.
वेरुळ येथील कैलास मंदिराचा देखावा प्रत्येकी ९० फूट लांबी आणि उंचीचा तर, ५२ फूट रुंदीचा आहे. मंदिराच्या दर्शनी बाजूला दोन विजयस्तंभ असतील. मूळ काळ्या दगडातील हे मंदिर लाकडामध्ये साकारण्यात येणार आहे. काही ठिकाणी फायबरचा वापर केला जाणार आहे. सात मजली कळस हे कैलास मंदिराचे वैशिष्टय़ असून कळसाच्या दर्शनी भागामध्ये ६० हत्तीची शिल्पे असतील. तर, वरच्या भागामध्ये वनराज सिंहाच्या प्रतिकृती असतील. या मंदिराची प्रतिकृती दगडी बांधकामाप्रमाणे हुबेहूब काळपट दिसावी यासाठी ग्रे रंगाचा उपयोग केला जाणार आहे. सुमारे पावणेदोन लाख छोटय़ा बल्बच्या विद्युत रोषणाईने कैलास मंदिर उजळून निघेल. त्याचप्रमाणे बाह्य़ स्वरूपामध्ये मंदिरावर एलइडी पार प्रणालीचा वापर करून प्रकाशझोत सोडण्यात येणार आहे. जगातील हे अद्भुत आश्चर्य गणेशोत्सवामध्ये साकारणे हे कलाकार म्हणून आव्हान आहे. आतापर्यंत किमान दहा वेळा या मंदिराला भेट दिली असून हुबेहूब प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न असल्याचेही विवेक खटावकर यांनी सांगितले.