पुण्यनगरीच्या वैभवशाली गणेशोत्सवाची नांदी गणेश चतुर्थीला काढण्यात येणाऱ्या छोटेखानी प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकांपासूनच होते. मानाच्या पाचही गणपतींसह श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती या गणेश मंडळांच्या श्रींची प्रतिष्ठापना माध्यान्हीपूर्वीच होणार आहे, तर काही मंडळांची दुपारी दीडपूर्वी प्रतिष्ठापना होणार आहे.

श्री कसबा गणपती

पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची मिरवणूक उत्सव मंडपापासून सकाळी साडेआठ वाजता सुरू होणार आहे. देवळाणकर बंधू यांचा नगारावादनाचा गाडा, श्रीराम आणि शिवतेज ढोल-ताशा पथकाचे वादन त्याचप्रमाणे प्रभात बँडपथक मिरवणुकीमध्ये असेल. मूर्तिकार पार्सेकर यांच्याकडून ‘श्रीं’ची मूर्ती पारंपरिक चांदीच्या पालखीतून उत्सव मंडपामध्ये आणण्यात येईल. प्रकाश प्रभुणे यांच्या हस्ते सकाळी ११ वाजून ३६ मिनिटांनी श्रींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

श्री तांबडी जोगेश्वरी

ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी या मानाच्या दुसऱ्या गणपतीची मिरवणूक सकाळी १० वाजता केळकर रस्त्यावरील मंदार लॉजजवळून निघणार आहे. सतीश आढाव यांचे नगारावादन, न्यू गंधर्व बँडपथक आणि शिवमुद्रा ढोल-ताशा पथक मिरवणुकीमध्ये असेल. गंगोत्री ग्रीन बेल्टचे मििलद केळकर आणि प्रसिद्ध गायिका अपर्णा केळकर यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.

श्री गुरुजी तालीम

श्री गुरुजी तालीम या मानाच्या तिसऱ्या गणपतीच्या मिरवणुकीला सकाळी दहा वाजता गणपती चौकातून प्रारंभ होईल. फुलांची आकर्षक सजावट असलेल्या रथामध्ये श्रींची मूर्ती विराजमान असेल. जयंत नगरकर यांचे नगारावादन मिरवणुकीच्या अग्रभागी असेल. मणिलाल गड्डा यांच्या हस्ते दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

तुळशीबाग मंडळ

मानाचा चौथा गणपती असलेल्या श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळाच्या मिरवणुकीला उत्सव मंडपापासून सकाळी नऊ वाजता सुरुवात होणार आहे. फुलांची सजावट केलेल्या रथामध्ये विराजमान श्रींच्या मिरवणुकीमध्ये गजलक्ष्मी, शौर्य आणि रुद्रगर्जना ही ढोल-ताशा पथके असतील. मंडळातर्फे यंदा मूर्तीला चांदीची प्रभावळ करण्यात आली आहे. पं. वसंतराव गाडगीळ यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

केसरीवाडा ट्रस्ट

मानाचा पाचवा केसरीवाडा ट्रस्टच्या गणपतीची मिरवणूक सकाळी नऊ वाजता निघणार आहे.

बिडवे बंधू यांचे सनईवादन, श्रीराम ढोलताशा पथकाचे वादन मिरवणुकीच्या अग्रभागी असेल. रोहित टिळक आणि प्रणति टिळक यांच्या हस्ते सकाळी साडेदहा वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.

भाऊसाहेब रंगारी गणपती

विद्युत रोषणाईच्या गणपतींमध्ये मानाचा पहिला गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाच्या मिरवणुकीस सकाळी आठ वाजता प्रारंभ होईल. ताल, वाद्यवृंद, शंभूगर्जना या पथकांचे वादन रंगणार आहे. महापौर प्रशांत जगताप रथाचे सारथ्य करणार असून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

अखिल मंडई मंडळ

अखिल मंडई मंडळाच्या मिरवणुकीस सकाळी साडेनऊ वाजता सुरुवात होणार आहे. फुलांनी सजविलेल्या आकर्षक रथामध्ये विराजमान शारदा-गजानन हे मिरवणुकीचे मुख्य आकर्षण आहे. स. प. महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.

दगडूशेठ हलवाई गणपती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या मिरवणुकीस सकाळी आठ वाजता प्रारंभ होणार आहे. देवळाणकर बंधूंचे नगारावादन, प्रभात आणि दरबार बँडपथके मिरवणुकीच्या अग्रभागी असतील.

सकाळी ११ वाजून १ मिनिटांनी इंदूर येथील त्रिपदी परिवाराचे बाबासाहेब तराणेकर यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. ट्रस्टने साकारलेल्या महाबलीपूरम येथील शिवमंदिराच्या प्रतिकृतीवरील विद्युत रोषणाईचे उद्घाटन राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्या हस्ते सायंकाळी सात वाजता होणार आहे.