News Flash

यंदा किती तास..?

मिरवणूक कालावधीच्या चर्चेलाही पूर

पुण्यातील विसर्जन मिरवणुकीसाठी बुधवारी विविध मंडळांची रथ तयार करण्याची तयारी सुरू होती.

वाजतगाजत गणेश विसर्जनासाठी पुणे सज्ज; मिरवणूक कालावधीच्या चर्चेलाही पूर

वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी (१५ सप्टेंबर) दिमाखदार विसर्जन मिरवणुकीने होणार असली, तरी ही मिरवणूक किती तास चालणार हाच औत्सुक्याचा विषय आहे. पोलिसांनी विसर्जन मिरवणुकसाठी शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. विसर्जनाच्या आदल्या दिवसापासून शहराच्या मध्यभागातील सर्व व्यवहार जवळपास ठप्प होतात. गेल्या काही वर्षांपासून पोलिसांनी मिरवणूक लवकर आटोपण्यासाठी कार्यकर्त्यांच्या प्रबोधनावर भर दिला असला, तरी त्याचा काही उपयोग न होता कार्यकर्त्यांकडे सोपवून दिलेली ही मिरवणूक संथगतीने पुढे सरकते, असाच अनुभव आहे.

पुण्यातील उत्सवाला परंपरा आहे. विसर्जन मिरवणूक वेळेत आटोपण्यासाठी पोलिसांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन मंडळांना सूचना दिल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन कार्यकर्त्यांनी करावे तसेच ध्वनिप्रदूषणासंदर्भात दिलेले निर्देश पाळावेत अशी अपेक्षा पोलिसांनी ठेवली आहे. मात्र हे नियम धुडकावणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिला आहे.

गेल्या काही वर्षांपासून विसर्जन मिरवणूक संपण्यास चोवीस तासांपेक्षा जास्त कालावधी लागत आहे. पोलिसांकडूनही विसर्जन मिरवणूक वेळेत आटोपण्यासाठी फारसे प्रयत्न केले जात नाहीत. मंडईतील टिळक पुतळ्यापासून सकाळी साडेदहाला मिरवणूक सुरु होते. मात्र, मानाच्या पाच मंडळांची मिरवणूक संपायला सायंकाळ होते. त्यानंतर रोषणाईची मंडळे लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी आटापिटा करतात. दरम्यान, भाविकांच्या दृष्टीने आकर्षणाचा विषय असलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ आणि अखिल मंडई मंडळ मुख्य मिरवणुकीत मध्यरात्री सहभागी होतात. ही दोन्ही मंडळे बेलबाग चौकातून मार्गस्थ झाल्यानंतर उर्वरित मंडळांना मिरवणूक मार्गावर प्रवेश दिला जातो.

विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी मिरवणूक संपते. तोपर्यंत अर्धा दिवस उलटलेला असतो. विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी शहरातील वाहतूक थोडय़ा फार प्रमाणात सुरळीत होते. मिरवणुकीच्या आदल्या दिवशी रात्रीपासूनच मध्यभागातील सर्व व्यवहार जवळपास ठप्प होतात. व्यवहार सुरळीत होण्यासाठी तब्बल तीस ते पस्तीस तासांचा कालावधी लागतो. यंदा हे चित्र बदलणार का याबाबत उत्सुकता आहे.

निर्विघ्न निरोपासाठी

  • सकाळी साडेदहाच्या सुमारास मंडईतील टिळक पुतळा चौकातून प्रथेप्रमाणे मिरवणुकीस प्रारंभ.
  • लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्त्यासह प्रमुख नऊ विसर्जन मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त
  • संपूर्ण मार्गाची बॉम्बशोधक पथकातील तेरा श्वानांकडून तपासणी करणार.
  • दोन अतिरिक्त पोलीस आयुक्त, १७ पोलीस उपायुक्त, ३९ सहायक आयुक्त, १८४ पोलीस निरीक्षक, ६६९ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, ७ हजार ६०५ पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाच्या चार तुकडय़ा, शीघ्र कृतिदलाच्या आठ तुकडय़ा, गृहरक्षक दलातील ५०० जवान, प्रशिक्षणार्थी पोलीस असा नऊ हजार पोलिसांचा बंदोबस्त.
  • टिळक रस्त्यावरून जाणाऱ्या मंडळांसाठी यंदा विश्व हॉटेल चौकातून मार्ग
  • विसर्जन मार्गावर तेरा मनोरे, ११८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे निगराणी
  • प्रमुख १७ रस्ते वाहतुकीसाठी बंद

अडीचशे ते तीनशे मंडळांसाठी पाच ‘धक्का पथके

लक्ष्मी रस्त्याखालोखाल टिळक रस्त्यावरून सर्वाधिक मंडळे मिरवणुकीत सहभागी होतात. मंडळांच्या कार्यकर्त्यांना पुढे नेणे, दोन मंडळांमधील अंतर कमी करण्यासाठी पोलिसांकडून दरवर्षी धक्का पथकांचा (पुशिंग स्क्वॉड्स) वापर करण्यात येतो. यंदाच्या वर्षी विसर्जन मार्गावर पाच धक्का पथके तैनात करण्यात येणार आहेत. लक्ष्मी रस्त्यावर तीन आणि टिळक रस्त्यावर दोन पथके तैनात करण्यात येणार असल्याचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सी. एच. वाकडे यांनी सांगितले. मात्र, या दोन्ही मार्गावरून जाणाऱ्या मंडळाची संख्या पाहता ही पथके अपुरी पडणार असल्याचे चित्र आहे.

Untitled-29

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2016 2:18 am

Web Title: ganesh idols immersion at pune
Next Stories
1 मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश नाहीत
2 मतदार नोंदणीसाठी ‘आर्ची’चे आवाहन
3 चक्रीवादळाची ‘आपत्ती’ रोखणार
Just Now!
X