पुण्यातील गणेशोत्सवाची कीर्ती सर्वदूर पसरलेली असल्यामुळे गणेशोत्सवात राज्यातून आणि देशाच्या वेगवेगळ्या भागांतून मोठय़ा संख्येने भाविक उत्सवाच्या कालावधीत पुण्यात येतात. एवढेच नाही तर गेल्या काही वर्षांपासून मोठय़ा संख्येने परदेशी पर्यटकही उत्सवात हजेरी लावत आहे. गौरी विसर्जनानंतर खऱ्या अर्थाने मध्यभागात गर्दी होऊ लागते. अशा परिस्थितीत फक्त पोलीस वाहतूक आणि गर्दी नियंत्रित करू शकत नाहीत. त्यामुळे या उत्सवी गर्दीला शिस्त लावण्यासाठी युवक पोलिसांच्या मदतीला आले आहेत. पोलिसांबरोबरच विविध संस्थांमधील कार्यकर्ते तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक-युवती  मोठय़ा उत्साहाने उत्सवी गर्दीला शिस्त लावत आहेत.गणेशोत्सवात खऱ्या अर्थाने गौरी विसर्जनानंतर गर्दी होते. रस्त्याच्या कडेला थाटलेली दुकाने आणि खाद्यपदार्थ विक्रेते मोठय़ा संख्येने दिसू लागतात. उत्सवाच्या काळात चार पैसे मिळतील, अशा आशेने अनेकजण तात्पुरत्या स्वरुपात रस्त्याच्या कडेला व्यवसाय करतात. उत्सवाच्या काळात अशी मोठी जत्रा अनेक भागात दिसते. या उत्सवी गर्दीत कुटुंबकबिल्यासह सहभागी होणारे अनेकजण असतात. उत्सवातील आनंद लुटणाऱ्या या गर्दीला शिस्त लागावी आणि देखावे पाहात फिरणाऱ्यांना चालणे सुकर व्हावे म्हणून पोलिसांकडून प्रयत्न केले जातात. मध्य भागातील रस्ते बंद ठेवले जातात. छोटय़ा रस्त्यांवर आणि चौकांमध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे काम पोलिसांकडून केले जाते. या काळात पोलिसांना बंदोबस्त पार पाडण्यासाठी मदत म्हणून मोठय़ा प्रमाणावर गेल्या काही वर्षांपासून स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते आणि महाविद्यालयीन युवक-युवती उत्स्फूर्तपणे पुढे येत आहेत.

उत्सवाच्या काळात गर्दीवर नियंत्रण ठेवणे तसेच वाहतुकीला शिस्त लावणे तसे कठीण काम आहे. मध्य भागातील अरुंद रस्त्यांवरून जाणारी वाहने आणि उसळलेल्या गर्दीला नियंत्रित करणारी तरुणाई सध्या चौकाचौकात पाहायला मिळत आहे. हे युवक वाहतुकीचे नियंत्रण करताना कुठेही वादाचे प्रसंग घडत नाहीत. घडले तर पोलीस मदतीला येतात. पण शक्यतो वाद टाळून उत्सवी गर्दीला मार्ग दाखविण्याचे काम तरुणाईकडून केले जात आहे. उत्सवाच्या कालावधीत अशा प्रकारचे काम स्वयंस्फूर्तीने करणाऱ्या काही युवक-युवतींशी संवाद साधला असता उत्सवी गर्दीला नियंत्रित करणाऱ्या तरुणाईचा उत्साहही तितकाच दांडगा असल्याची प्रचितीदेखील आली. यासंदर्भात चाणक्य मंडलचा सागर वैद्य म्हणाला की, मी मूळचा कोकणातील साखरपा येथील आहे. गणेशोत्सवात शहराच्या मध्य भागात होणारी गर्दी आणि वाहतूक नियंत्रित करण्याचे काम वेगळा अनुभव देऊन जाते. चाणक्य मंडलकडून साधारणपणे उत्सवाच्या काळात नऊशे विद्यार्थी पोलिसांना साहाय्य करतात. चाणक्य मंडलच्या विद्यार्थ्यांकडून शनिवारवाडा, बेलबाग चौक, मंडई, टिळक रस्ता, कर्वे रस्ता, नळस्टॉप चौक भागात पोलिसांना साहाय्य केले जाते. दरवर्षी या उपक्रमात नऊशे विद्यार्थी सहभागी होतात. शक्यतो वाद न घालता गर्दीला नियंत्रित करणे, कुठेही चेंगराचेंगरी होणार नाही, याची काळजी घेणे अशी कामे आम्ही करतो, असे अभिजित काळे, पूर्वा बोरकर, क्रांती हरपळे यांनी सांगितले. हा अनुभव आम्हाला नेहमी उपयोगी पडेल. कठीण परिस्थितीत काम कसे करायचे, संवाद कसा साधायचा, गर्दीचे नियंत्रण तसेच एकाच वेळी समूहाशी संवाद कसा साधायचा याचे प्रशिक्षण मिळते, असेही या युवकांनी सांगितले.