गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या गर्दीमुळे या काळात प्रत्येक मंडळ, रस्ता यांठिकाणी विविध उत्पादनांची, सेवांची जाहिरातबाजी सुरू असते. मात्र, या गर्दीने आता नाटय़ निर्मात्यांनाही आकर्षून घेतले असून इतर व्यावसायिक जाहिरातींबरोबरच नाटकांच्या जाहिरातीही उत्सवात केल्या जात आहेत.
गणेशोत्सव हा गेल्या अनेक वर्षांपासून जाहिरातबाजीचा उत्सव झाला आहे. सध्या शहरातील सर्व रस्त्यांवर कमानी, फलक या माध्यमातून विविध सेवा आणि उत्पादनांच्या जाहिराती करण्यात येत आहेत. सर्वच मुख्य रस्त्यांवर जाहिराती करणाऱ्या कमानी उभ्या आहेत. मोबाईल कंपन्या यामध्ये आघाडीवर आहेत. स्थानिक ज्वेलर्स, दुकाने यांनीही मंडळांच्या साथीने आपल्या जाहिराती केल्या आहेत. काही मंडळांच्या देखाव्यांमधूनही जाहिराती करण्यात येत आहेत. जाहिरातींच्या व्यावसायिक दरापेक्षाही उत्सवाच्या काळात एखाद्या मंडळाच्या साथीने जाहिराती करणे अधिक परवडत आहे. मंडळांना देणगी स्वरूपात काही रक्कम देऊन त्याबदल्यात जाहिरात फलक लावले जात आहेत. या सगळ्यामध्ये नाटकांच्या जाहिराती लक्षवेधक ठरत आहेत.
गणेशोत्सवामध्ये होणाऱ्या गर्दीने आता नाटय़ निर्माते आणि प्रसिद्धीप्रमुख यांनाही आकर्षून घेतले आहे. काही मंडळांसमोर लावण्यात आलेल्या मोठय़ा मोठय़ा जाहिरात फलकांबरोबरच नाटकाच्या जाहिरातींचे फलकही उभे आहेत. सध्या गाजत असलेल्या अनेक नाटकांचा यामध्ये समावेश आहे. याबाबत पराग पब्लिसिटीचे प्रवीण बर्वे यांनी सांगितले, ‘नाटकांना जाहिराती करण्यासाठी फारशी माध्यमे नाहीत. गणेशोत्सवाच्या काळात मोठय़ा प्रमाणावर गर्दी होते. यामध्ये बाहेरगावाहून येणारे लोकही असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या जाहिरातींचा प्रयोग करण्यात आला आहे. नाटकाचा फलक पाहून प्रेक्षकांचीही नाटकाबाबतची उत्सुकता वाढते. त्याचप्रमाणे बाहेरगावचे प्रयोगही मिळू शकतात. जाहिराती करण्यात आलेल्या संस्था या पुण्याबाहेरील आहेत. त्यामुळे त्याची पुण्यातील प्रेक्षकांना माहिती होण्यासाठी हे उत्सवाचे माध्यम योग्य वाटले.’

देखाव्यांतून जाहिराती
काही मंडळांमध्ये स्थानिक उत्पादनांच्या जाहिरातीही देखाव्यातून करण्यात आल्या आहेत. उत्पादनांची पाकिटे वापरून देखावे, उत्पादनाच्या उपयोगावर आधारित देखावे तयार करून जाहिराती करण्यात येत आहेत.