कचरापेटय़ा उखडल्यानंतर पुणे महापालिकेचे अजब उत्तर

कचरापेटीचे काम काय?.. लहान मूलदेखील या प्रश्नावर ‘कचरा टाकण्यासाठी’ असेच उत्तर देईल. जंगली महाराज रस्ता आणि फग्र्युसन रस्त्यावर अगदी परवापर्यंत दिसणाऱ्या गडद हिरव्या रंगाच्या छोटय़ा कचरापेटय़ा (लिटर बिन्स) एका रात्रीत उखडण्यात आल्या आहेत. एक वेळ कचरापेटी चोरीस जाणे ही देखील फार विचित्र म्हणावी अशी गोष्ट नाही. पण या कचरापेटय़ा चोरीस गेल्या नसून त्या पालिकेनेच उखडल्या आहेत. त्याविषयी विचारले असता मिळालेले उत्तर मजेशीर आहे. ‘लोक मोठय़ा प्रमाणावर टाकत होते’ म्हणून कचरापेटय़ा उखडाव्या लागल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.

गेल्या आठवडय़ापर्यंत जंगली महाराज रस्ता आणि फग्र्युसन रस्त्यावर अगदी थोडे अंतर गेल्यावर एकेक छोटी कचपेटी होती. ‘लोकसत्ता’ने केलेल्या पाहणीत झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकापासून गरवारे पुलापर्यंत आणि गरवारे पुलापासून पुढे तुकाराम पादुका चौकापर्यंत एकही छोटी कचरापेटी शिल्लक नाही.

‘ऑलिव्ह ग्रीन’ रंगाच्या आणि ओला-सुक्या दोन्ही डब्यांसाठी तोच रंग वापरलेल्या या कचरापेटय़ा अनाकर्षक असूनही लक्ष वेधून घेणाऱ्या ठरल्या होत्या. ‘क्लीन अँड ग्रीन सिटी इनिशिएटिव्ह’चा एक भाग असलेल्या या कचरापेटय़ा पदपथांवरून चालणाऱ्या नागरिकांना कचरा टाकण्यासाठी कधीही सोईच्या ठरल्या नाहीत. उलट अनेक ठिकाणी त्यांचा अडथळाच होत होता. आताही कचरापेटय़ा पूर्णत: उखडलेल्या नसल्यामुळे त्यांचा चालणाऱ्यांना अडथळाच होत आहे.

  • छोटय़ा कचरापेटय़ा बसवल्या; पण नियोजनशून्यतेचे प्रदर्शन
  • उखडल्या तरीही अडथळाच
  • शहर स्वच्छतेत खासगी कंपन्यांचा हातभार

डेक्कन जिमखाना परिसर सुधारणा समितीने या कचरापेटय़ांना विरोध दर्शवला. ही ‘लिटर बिन्स’ असून लोक त्यात खूप मोठय़ा प्रमाणावर कचरा टाकू लागले. त्यामुळे कचरापेटय़ा काढण्यात आल्या असून आता कचरा टाकण्यासाठी नवीन सोय केली जाणार आहे. त्याचा आराखडा तयार आहे.

सुरेश जगताप, घनकचरा विभाग प्रमुख सहआयुक्त