उत्तम रस्ते, आंतरराष्ट्रीय विमानतळाची उणीव, गुंडगिरी, कामगार संघटनांचा त्रास

पुणे : जलद वाहतूक, उत्तम रस्ते आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाची उणीव, गुंडगिरी, कामगार संघटनांचा त्रास आदी कारणांमुळे पुण्यासह पिंपरी चिंचवड, चाकण या औद्योगिक भागातील उद्योजक त्रस्त झाले आहेत. सध्याच्या या परिस्थितीत तातडीने सुधारणा न झाल्यास पुण्यातील कंपन्या चीनमधील शांघाय येथे स्थलांतरित करण्याचा इशारा सोमवारी जर्मन कंपन्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला.

Black market, pune RTO, brokers,
पुणे आरटीओत ‘काळाबाजार’! दलालांनी उभारली पर्यायी यंत्रणा; कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
cashless health insurance
‘कॅशलेस’ आरोग्य विम्याला डॉक्टरांचा विरोधच! जाणून घ्या कारणे…
Tesla Robotaxi launches on August 8
एलॉन मस्कने खेळला नवा गेम! टेस्लाच्या ‘या’ नव्या कारला आणतेय बाजारात, ऐकताच बाकी कंपन्यांना फुटला घाम

पुणे जिल्ह्य़ातील औद्योगिक परिसरात असलेल्या जर्मन कंपन्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जर्मनीचे महावाणिज्य दूत डॉ. युरगेन मोऱ्हाड आणि त्यांचा सहकारी, जर्मन कंपन्यांचे अधिकारी तसेच जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.

जिल्ह्य़ातील औद्योगिक भागात रस्ते चांगले नाहीत, पायाभूत सुविधा नाहीत, स्थानिक गुंडगिरी अशा विविध समस्या आहेत. या समस्या स्थानिक पातळीवर सहजरीत्या सोडवता येण्यासारख्या आहेत. मात्र औद्योगिक पट्टय़ात कंपन्या चालवण्यासाठी अनुकूल वातावरण नसल्याने कंपन्यांची अपेक्षित वाढ होत नाही. परिणामी गेल्या काही वर्षांपासून एकूणच व्यवसायावर गंभीर परिणाम होत आहे, असे कंपन्यांचे म्हणणे असून ही परिस्थिती जर्मनीच्या महावाणिज्य दूतांसह कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी राम यांच्या निदर्शनास आणून दिली. या समस्यांवर तातडीने उपाययोजना न झाल्यास पुण्यातील कंपन्या चीनमधील औद्योगिक शहर असलेल्या शांघाय येथे नाइलाजाने स्थलांतरित कराव्या लागतील, असा इशाराही बैठकीच्या अखेरीस देण्यात आला.

दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेला सर्वाधिक महसूल औद्योगिक क्षेत्रातून मिळतो. परंतु, या परिसरात मूलभूत सुविधांची वानवा आहे. त्या समस्यांकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. औद्योगिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी हिंजवडी महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाने (एमआयडीसी) स्वतंत्र व्यवस्था केली आहे. त्या धर्तीवर कचरा विलगीकरण केंद्र उभारणी आणि कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवण्यात यावी, अशी मागणी सातत्याने औद्योगिक परिसरातून होत आहे. चाकण एमआयडीसी, सणसवाडी या ठिकाणी रस्ते, पाणी, मलनि:सारण अशा मूलभूत सुविधांची वानवा आहे,असाही मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राम यांनी जर्मन कंपन्यांच्या शिष्टमंडळाला बैठकीत दिली.

गुंडगिरी आवरा

जिल्ह्य़ातील चाकण, रांजणगाव भागातील औद्योगिक पट्टय़ातील गुंडगिरीने पुन्हा डोके वर काढले आहे. कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मारहाण करणे, धमकावणे यांसारखे प्रकार घडत आहेत. काही कंपन्यांमध्ये कामगार पुरवठा, स्वच्छता, भंगारमाल खरेदी अशा कामांचा ठेका मिळवण्यासाठी आणि कामगार भरतीसाठी सातत्याने दबाव आणला जातो. याबाबतही शिष्टमंडळाने या बैठकीत तक्रारी केल्या.