कोणेतेही आढेवेढे न घेता पुणेकरांना दोन वेळा नियमित पाणीपुवरठा करा, अशा सूचना जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी सांगितले. पाणीपुरवठा करण्यासाठी विलंब करू नका, असेही त्यांनी बजावले.
राष्ट्रीय ग्रामस्वराज योजनेअंतर्गत जिल्हा परिषद सदस्यांसाठी आयोजित तीन दिवसांच्या क्षमतावृद्धी कार्यशाळेचा समारोप अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला. त्या प्रसंगी ते बोलत होते. यशदाचे महासंचालक डॉ. संजय चहांदे या प्रसंगी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, यंदा चांगला पाऊस झाल्याने धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे पुणेकरांना दोन वेळा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. मात्र, दोन वेळा पाणीपुरवठा करण्याची अंमलबजावणी महापालिका प्रशासनाकडून झालेली नाही. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांतही चांगला पाऊस होणार असल्याच्या अंदाजामुळे पावसाळा संपेपर्यंत धरणे भरलेली राहतील. हे पाणी पुणेकरांना दिले नाही, तर समुद्रालाच जाऊन मिळेल. त्यामुळे पुणेकरांना पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून शुल्क आकारू नका असेही जलसंपदा अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
राज्यात अनेक ठिकाणी धरणे पाण्याने भरलेली आहेत. त्यामुळे धरणातून विसर्ग सोडण्यात येत आहे. नद्यांची पातळी वाढून काही ठिकाणी पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना पुराचा इशारा देऊन त्यांना जागरूक करणे हे जिल्हा परिषद सदस्यांची जबाबदारी आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.
‘कोणी काय बोलावे हा ज्याचा त्याचा प्रश्न’
माझ्या वेळेपेक्षाही यंदा पुण्यात जास्त खड्डे आहेत, या खासदार सुरेश कलमाडी यांच्या वक्तव्याविषयी विचारले असता कोणी काय बोलावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, अशी टिप्पणी केली. यंदा पाऊस अधिक झाल्यामुळे राज्यात सगळीकडेच खड्डय़ांची समस्या आहे. पुणे त्याला अपवाद असू शकेल. मात्र, महापालिका अधिकारी आणि पदाधिकारी यांच्याशी सातत्याने संपर्कात असून युद्ध पातळीवर खड्डे बुजविण्याविषयीच्या सूचना दिल्या आहेत. दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे खड्डे बुजविण्याचे काम झाले. मात्र, पुन्हा पावसास सुरुवात झाली आहे. गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्ते चांगले करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. गणेशोत्सव किती महत्त्वाचा सण आहे हे सर्वानाच माहीत आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.