महाराष्ट्रात जे राजकारण सुरू आहे, ते आपल्याला न्याय देणारे नाही. येथील शेतकरी, दलित, आदिवासी कोणीच सुखी नाही, स्त्रिया सुरक्षित नाहीत, मग, सरकार झोपा काढते आहे का, असा प्रश्न मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी चिंचवड येथे बोलताना उपस्थित केला. राजकीय व्यवस्थेला दंगली हव्याच आहेत. मतांचे राजकारण व सत्तेच्या गणितासाठी त्यांना हवी असलेली जातिव्यवस्था मोडून काढण्याचे काम राजकीय पक्ष कधीही करणार नाहीत, असेही ते म्हणाले.
चिंचवडच्या नेत्रसेवा प्रतिष्ठानच्या शहीद भगतसिंग व्याख्यानमालेत ‘समाजप्रबोधन व सांस्कृतिक शुद्धीकरण’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. स्वातंत्र्यपूर्व काळातील इतिहास, भगतसिंगांचे बलिदान, टिळक युग, गांधींचा उदय, राष्ट्रीय चळवळ यासह तत्कालीन सामाजिक विषयांचा ऊहापोह करतानाच सध्याच्या परिस्थितीवरही सबनीस यांनी परखड भाष्य केले. ते म्हणाले, हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत. दुष्काळाने कंबरडे मोडलेले शेतकरी कर्जबाजारी झाले, ते मुलींचे विवाह व मुलांचे शिक्षण करू शकत नाहीत. बसचा पास मिळत नाही म्हणून लातूरच्या तरूण मुलीला आत्महत्या करावी लागते, हैद्राबादचा रोहित वेमुला आत्महत्या करतो, त्याच्या आत्महत्येची खरी कारणे शोधावी लागतील. सध्या विस्फोटक परिस्थिती आहे. मरण स्वस्त तर जीवन महाग आहे. सांस्कृतिक विकृती निर्माण होतात, भ्रष्टाचाराचा पूर वाहतो. सामाजिक विकृतीची परंपरा समृद्ध होत जाते. 92 वर्षाच्या वृध्देवरही बलात्कार होतो. मनुष्य जात किती नालायक आहे, त्याचे उदाहरण पहायला मिळते. राजकीय पक्षाच्या नेत्यांनी महापुरूष राबवून घेतले. महापुरूषांच्या नावाखाली दुकानदारी सर्वच पक्षात असून स्वत:च्या स्वार्थासाठी नेत्यांनी संतांचा वापर केला.
जातविभागणी हा सांस्कृतिक गाढवपणा आहे, असे ते म्हणाले.
‘श्रीहरी अणे यांनी पद सोडून वक्तव्य करावे’
श्रीहरी अणे महाधिवक्ता पदावर असताना मराठवाडा, विदर्भ तोडण्याची भाषा करत आहेत. त्यांनी हे वक्तव्य पद सोडून करावे, असे मत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे पाप महाराष्ट्रानेच नेमलेला वकील करतो आहे, हे दुर्दैव आहे. या दोन्ही भागांवर अन्याय झाला हे मान्य केले तरीही महाराष्ट्राचे तुकडे करणे आपल्याला कदापि मान्य नाही, असे ते म्हणाले. विधानसभेच्या प्रेक्षक गॉलरीत ‘मनुवाद मुर्दाबाद’च्या घोषणा देत पत्रके भिरकावणाऱया सचिन खरात यांच्या आंदोलनासाठी सबनीस यांनी शहीद भगतसिंगांचा संदर्भ दिला. सत्ताधाऱयांकडून जेव्हा अन्याय होतो, सामान्यांची कुचंबणा केली जाते, तेव्हा तरूणाई भडकते आणि विस्फोटक बनते, अशी टिप्पणी त्यांनी केली.