स्वच्छतेसंदर्भातील निविदेमध्ये कराचा समावेश नसल्याने प्रक्रिया रखडली

शहरातील नाटय़गृहे आणि कलादालनातील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाल्यानंतर दैनंदिन स्वच्छतेच्या कामांसाठी देण्यात येणाऱ्या ठेक्याच्या प्रक्रियेला वस्तू आणि सेवा कराचा (गुड्स सव्‍‌र्हिस टॅक्स-जीएसटी) फटका बसला आहे. कलादानातील स्वच्छतेसंदर्भातील निविदा मान्य झाल्यानंतर प्रत्यक्षात कार्य आदेश (वर्क ऑर्डर) देण्याची वेळ आलेली असतानाच या निविदेमध्ये जीएसटीचा समावेश नसल्यामुळे ठेका प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. जीएसटीमुळे स्वच्छतागृहांच्या ठेक्याची प्रक्रिया रखडली असल्याचे स्पष्ट झाले असून दैनंदिन स्वच्छतेसाठी नाटय़गृह आणि कलादालनांच्या व्यवस्थापनाला महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे हा नाटय़गृहातील स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने काही दिवसांपूर्वी यशवंतराव चव्हाण नाटय़गृहातील स्वच्छेताबाबतची नाराजी समाजमाध्यमातून व्यक्त केली होती. त्यानंतर एकूणच शहरातील महापालिकेची नाटय़गृहे, कलादालन, सांस्कृतिक भवनातील स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीचा मुद्दा ऐरणीवर आला होता. या पाश्र्वभूमीवर महापौर मुक्ता टिळक यांनी काही नाटय़गृहे आणि कलादालनांची पाहणी केली होती. निविदा प्रक्रियेअभावी नाटय़गृहांमधील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाल्याचेही त्या वेळी पुढे आले होते. त्यामुळे महापालिका प्रशासनावर चोहोबाजूने टीका होण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे खडबडून जाग्या झालेल्या महापालिका प्रशासनाने अखेर नाटय़गृह आणि सांस्कृतिक भवनांमध्ये स्वच्छताविषय कामे करण्यासाठी निविदा काढण्याचा निर्णय घेतला होता. महापालिकेच्या स्थायी समितीनेही प्रशासनाच्या या प्रस्तावाला ऑगस्ट महिन्यात मान्यता दिली होती. त्यामुळे नाटय़गृह, कलादालने, सांस्कृतिक भवनामधील स्वच्छतागृहांची दैनंदिन कामे मार्गी लागतील, असे वाटत असतानाच पुन्हा ठेक्याची कामे रखडल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिकेच्या मालकीच्या नाटय़गृहे, कलादालनातील स्वच्छतागृहांसाठी एकत्रित निविदा मागविण्यात आली होती. त्या वेळी जीएसटीचा विचार त्यामध्ये करण्यात आला नव्हता. त्यातच ज्या कामांची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे मात्र कार्य आदेश देण्यात आलेले नाहीत, अशा २२ ऑगस्टपर्यंतच्या निविदा पुन्हा राबवाव्यात, असे आदेश राज्य शासनाने दिले होते. त्यामुळे कार्य आदेशापर्यंत आलेला हा ठेका रखडला आहे. त्यामुळे या कामांसाठी फेरनिविदा काढाव्या लागणार असून त्यामध्ये विलंब होणार असल्यामुळे नाटय़गृहातील स्वच्छतेचा प्रश्नही पुन्हा उद्भवणार आहे. दरम्यान, अल्प मुदतीच्या (शॉर्ट टेंडर) निविदा

प्रक्रिया मागविण्यात येणार असल्यातरी प्रत्यक्ष काम सुरू होण्यास अवधी लागणार असल्यावरही शिक्कामोर्तब झाले आहे.

दरम्यान, स्वच्छतेचे काम सुरू न झाल्यामुळे क्षेत्रीय कार्यालय किंवा महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतागृहात कामे करण्यात येत आहेत. तसा दावाही महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

देखभाल-दुरुस्तीसाठी चार निविदा

महापालिकेच्या मालकीची शहरात सहा नाटय़गृहे आणि सांस्कृतिक भवने आहेत. या नाटय़गृहांची देखभाल-दुरुस्ती महापालिकेकडून केली जाते. त्यासाठी चार निविदा प्रशासनाकडून काढण्यात आल्या आहेत. बालगंधर्व रंगमंदिर येथील कामासाठी तावरे फॅसिलिटी मॅनेजमेंट सव्‍‌र्हिसेस यांना दरमहा एक लाख ३० हजार रुपयांना काम देण्याचा प्रस्ताव आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाटय़गृह आणि महात्मा फुले सांस्कृतिक भवनाचे काम लता चव्हाण यांना दरमहा एक लाख वीस हजार रुपयांनी तर यशवंतराव चव्हाण नाटय़गृह, गणेश कला क्रीडा रंगमंच, पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, राजा रवी वर्मा न्यू आर्ट गॅलरी येथील स्वच्छताविषय कामांचा ठेका विमलाई ऑल टाईप क्लिनिंग वर्क्‍स यांना प्रत्येकी एक लाख २३ हजार रुपये याप्रमाणे देण्यात आला.