हर्षवर्धन पाटील याचे मत

काँग्रेस पक्षात राहून दुसऱ्या पक्षाची ‘एजंटगिरी’ करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे, असे स्पष्ट मत राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी चिंचवड येथे कार्यकर्त्यांच्या शिबिरात बोलताना व्यक्त केले. पक्षातील काही नेते व नगरसेवकांना उद्देशून त्यांनी हे विधान केले. आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्षनिष्ठा आणि निवडून येण्याची क्षमता हाच उमेदवारांसाठी निकष राहणार आहे. मुंबई-दिल्लीत वाऱ्या करतो, नेत्यांच्या गाडीत फिरतो, पुढे-पुढे करतो म्हणून कोणालाही उमेदवारी दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पाटील म्हणाले, निष्ठावंत शिबिरासाठी आले आणि ज्यांच्या मनात गद्दारीची भावना आहे, ते आले नाहीत. चंद्रकांत हंडोरे निरीक्षक म्हणून काम करणार आहेत, त्यांनी चौकशी करून दांडी मारणाऱ्यांवर कारवाई करावी. प्रामाणिक काम करणारा तसाच राहतो आणि नको त्यांचे फावते. काही जण ‘एजंट’ म्हणून दुसऱ्या पक्षाचे काम करत आहेत, असे ‘एजंट’ आपल्याला नको आहेत. पक्षविरोधी काम करणाऱ्यांना सांभाळण्याचे काही कारण नाही. स्पष्ट भूमिका ठेवूनच पुढील वाटचाल करावी लागणार आहे. पक्ष कोणाची वैयक्तिक जहागिरी नाही. िपपरी-चिंचवड काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. अण्णासाहेब मगर यांच्या पुढाकारातूनच महापालिकेची स्थापना झाली. शंकरराव बाजीराव पाटील यांना लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या विरोधात शहरातून मताधिक्य मिळाले होते. तेव्हा निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी पक्षात होती. आता दलाल आणि एजंट पक्षात आले आहेत. सकाळी एकीकडे आणि संध्याकाळी दुसरीकडे असणाऱ्यांच्या विरोधात आता कठोर भूमिका घ्यावी. नव्याने सुरुवात करायची असून रडायचे नाही तर लढायचे आहे. १२८ जागांसाठी ३२ प्रभाग होणार असल्याने नव्या प्रभागरचनेकडे लक्ष द्यावे लागणार आहे. भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त शहर हा विषय प्राधान्याने हाताळण्याची गरज आहे.

‘महाराष्ट्रात सरकार आहे की नाही’

महाराष्ट्रात सरकार आहे की नाही, अशी अवस्था आहे. सत्ताधाऱ्यांमधील सध्याचे वातावरण पाहता मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही. भाजप-शिवसेनेने एकमेकांची उणीदुणी काढताना कोणताही प्राणी शिल्लक ठेवलेला नाही. या दोन्ही पक्षांतील नेत्यांचे वर्तन म्हणजे महाराष्ट्रातील जनतेची थट्टा करण्याचा प्रकार आहे, अशी टीका हर्षवर्धन पाटील यांनी केली.\

िपपरी-चिंचवडमध्ये गुंडाराज, दहशतीचे वातावरण आहे. गुन्हेगारी घटना वाढल्या असून अवैध धंद्यांचा सुळसुळाट आहे. वाहनांची तोडफोड, जाळपोळ सुरू आहे. सामान्य माणसाला जगणे अवघड झाले आहे. दादागिरी आणि प्रचंड भ्रष्टाचार या गोष्टींना नागरिक कंटाळले आहेत.

 – हर्षवर्धन पाटील