चार वर्षांपूर्वी एका अपघातात त्याचे हात निकामी झाले.. मात्र, त्यानंतरही जिद्दीने तो उभा राहिला. दहावीची परीक्षा दिली आणि सध्या बारावीची परीक्षा देतो आहे. त्या मुलाचे नाव साहिल शेख! साहिलची गोष्ट इथे संपत नाही, तर सुरू होते.. साहिल बारावीची परीक्षा देतोय पण लेखनिक न घेता. तो स्वत:च उत्तरपत्रिका लिहितो.. तेही पायाने!
चार वर्षांपूर्वी शाळेच्या स्नेहसंमेलनातील कार्यक्रमांचा सराव करताना साहिलचा अपघात झाला. त्या अपघातात विजेचा धक्का बसल्यामुळे त्याचे दोन्ही हात निकामी झाले. खर तर त्याच वेळी साहिलच्या भविष्याची आशा अनेकांनी सोडूनच दिली होती. मात्र, सगळ्या आव्हानांवर मात करून तो उभा राहिला. हात निकामी झाल्यावर त्यांने पायाने लिहिण्याचा सराव सुरू केला. पायानेच लिखाण करून तो दोन वर्षांपूर्वी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला. सध्या साहिल बारावीची परीक्षा देत आहे.. तीही पायानेच उत्तरे लिहून.
साहिल वाणिज्य शाखेचे शिक्षण घेत असून बाहेरून परीक्षा देत आहे. त्याच्यासाठी परीक्षा केंद्रानेही स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अगदी उत्तरपत्रिकेवर नीट ओळी आखून तो पायाने उत्तरपत्रिका लिहितो.. तेही सुवाच्च अक्षरात! पायाने उत्तरपत्रिका लिहिणारा साहिल त्याच्या परीक्षा केंद्रावर इतर परीक्षार्थीच्याही औत्सुक्याचा विषय ठरला आहे. ‘दहावी झाल्यानंतर साहिलला पुढे शिकायचे होते. मात्र, नियमित महाविद्यालयांत प्रवेश घेऊन शिकणे शक्य नव्हते. म्हणून बाहेरून बारावीची परीक्षा देण्याचे त्याने ठरवले. तो पायाने उत्तम आणि वेगाने लिहू शकतो. असे असताना लेखनिक घेण्यापेक्षा स्वत:च लिहिणे त्याला योग्य वाटले. लेखनिकाने चूक केल्यास त्याला जबाबदार कसे ठरवणार, असाही विचार त्याने केला. बारावीनंतर पुढील शिक्षण घेण्याचीही त्याची इच्छा आहे,’ असे साहिलचे आजोबा अझिज शेख यांनी सांगितले.