राजकारणात कमी-जास्त तथा सत्तेत-सत्तेबाहेर असा खेळ सुरूच असतो. सत्तेतील विरोधात जातात, विरोधातील सत्तेत बसतात. सत्तेत असो की सत्तेबाहेर, सन्मार्ग सोडता कामा नये. लोकांचा आशीर्वाद असल्यास आपण पुन्हा येतोच, तुम्हाला कोणी रोखूच शकत नाही, असे सूचक विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी आळंदीत केले.

जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.  या वेळी फडणवीस म्हणाले की, भागवत धर्माने संस्कृती जिवंत ठेवण्याचे काम केले असून संतांच्या मांदियाळीने जगाला व्यापक विचार दिला आहे. विश्वाला घर मानून विश्वाच्या कल्याणाचा विचार त्यांनी मांडला.

सर्व विचारांना आपलं मानणारा वारकऱ्यांचा विचार आहे. त्यांनी प्रवेशाची अट ठेवली नाही. असलेच तर आत्मशुद्धीची अट आहे. लाखो लोक कोणतेही निमंत्रण नसताना दरवर्षी पालखी सोहळ्यासाठी एकत्र येतात, पंढरीकडे पायी वाटचाल करतात, ही अनोखी गोष्ट आहे.

त्यातून सकारात्मकता तयार होते. सध्याच्या सरकारने अनेक चांगल्या निर्णयांना स्थगिती दिल्याचा पुनरुच्चारही त्यांनी स्थानिक मुद्दय़ांचा संदर्भ देत केला.