जनावरांच्या चारा छावण्यांवर महिनोंमहिने राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष होत असून त्यांच्यासाठी स्वतंत्र आरोग्य यंत्रणा निर्माण करण्याची गरज ‘आरोग्य सेना’ या संघटनेने व्यक्त केली आहे. संघटनेतर्फे हाती घेण्यात आलेल्या दुष्काळ मोहिमेचा पहिला टप्पा खटाव तालुक्यात नुकताच पूर्ण झाला आहे. या मोहिमेतील निरीक्षणे संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय प्रमुख डॉ. अभिजित वैद्य यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत मांडली.
चारा छावण्यांवर जनावरांच्या देखभालीसाठी राहिलेल्या शेतकऱ्यांच्या आरोग्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्याचे संघटनेने म्हटले आहे. संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, या शेतक ऱ्यांची गावे सरासरी साडेपाच किलोमीटर अंतरावर आहेत. जनावरांचे डॉक्टर चारा छावण्यांना नियमितपणे भेट देत असले, तरी माणसांचे डॉक्टर तेथे येत नाहीत. प्राथमिक आरोग्य केंद्रे व रुग्णालये छावण्यांपासून खूप दूर असून रुग्णवाहिकांची सोय उपलब्ध नाही. तसेच छावणीवर अंघोळ व प्रातर्विधींसाठी कोणतीही सोय नाही. शेतकऱ्यांकडे रात्री झोपण्याच्या खाटा अभावानेच असल्यामुळे त्यांना जनावरांच्या गोठय़ातील अस्वच्छ वातावरणातच झोपावे लागते. चारा छावण्यांना पुरविण्यात येणारे कूपनलिकेचे पाणी क्षारांच्या अतिप्रमाणामुळे जनावरेही पीत नसल्याचे संघटनेने म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर चारा छावण्यांवरील शेतकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी व उपचार यंत्रणा त्वरित उभारण्यात यावी अशी मागणी संघटनेने केली आहे. प्रत्येक छावणीवर शेतकऱ्यांच्या संख्येनुसार पुरुष व स्त्रियांसाठी स्वतंत्र अंघोळीची व्यवस्था व शौचालये असावीत, छावण्यांवर पिण्यायोग्य पाणी, प्रथमोपचार पेटी व किमान दहा छावण्यांमागे एका रुग्णवाहिकेची सेवा पुरविली जावी अशा मागण्याही संघटनेने नोंदविल्या आहेत.
चारा छावणीतील जनावरांना औषधे दिली जात नसून ती पुरविण्याची सुविधा उपलब्ध करावी, तसेच जनावरांना चारा, पेंड व कॅल्शियम पावडरसह इतरही क्षार असणारे पौष्टिक खाद्य द्यावे, असे संघटनेने म्हटले आहे.