सातत्याने अधिक राहणारे तापमान या आठवडय़ात देखील पुणेकरांना ‘ताप’ देणार आहे. एकीकडे हवामान ढगाळ असताना या आठवडय़ात दिवसाचे तापमान ३९ अंश सेल्सिअसच्या खाली उतरणार नसल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.
गेले काही दिवस दुपारचे प्रचंड तापणारे ऊन नागरिकांसाठी त्रासदायक ठरते आहे. सध्या हवा ढगाळ असून पुढचा संपूर्ण आठवडा ती ढगाळच राहण्याची शक्यता आहे. रविवारी शहरातील कमाल तापमान ३९.१ अंश होते, तर लोहगाव येथे ४० अंश तापमानाची नोंद झाली. सोमवार आणि मंगळवारीही तापमान ४० अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर बुधवारपासून शनिवापर्यंत ते ३९ अंश राहील.
रविवारी राज्यात सर्वाधिक कमाल तापमान वध्र्यात (४३.४ अंश सेल्सिअस) नोंदवले गेले, तर नागपूरचे तापमान ४२.२ अंश होते. विदर्भात अकोला, अमरावती, चंद्रपूर, ब्रह्मपुरी, यवतमाळ येथील तापमान ४० अंशांहून अधिक होते, मराठवाडा विभागात परभणी (४२.६ अंश) आणि नांदेडला (४२.५ अंश) सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात मालेगाव, सोलापूर आणि जळगावचे तापमान ४० अंशांहून अधिक होते. विशेष म्हणजे महाबळेश्वरचे तापमानही अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजे ३३.५ अंश राहिले आहे. कोकण व गोवा विभागात भिरा येथील तापमान रविवारी सर्वाधिक (४२.५ अंश) होते. तर मुंबईचे तापमान ३४.५ अंश राहिले.