कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रातील घाटक्षेत्रांमध्ये शुक्रवारी (२१ ऑगस्ट) काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.

गेल्या चोवीस तासांत विदर्भातील गोंदिया, भंडारा जिल्ह्यांत काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद हवामान विभागाने केली आहे. पुढील दोन दिवस विशेषत: मध्य महाराष्ट्रातील घाटक्षेत्रात जोरदार पावसाचा इशारा कायम असून, या कालावधीत कोकण आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ापासून राज्याच्या विविध भागांत चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. विदर्भातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी असले, तरी उर्वरित राज्यात सर्वच ठिकाणी पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे. वाऱ्यांची चक्रीय स्थिती आणि कमी दाबाचे क्षेत्र पुन्हा निर्माण झाल्याने मध्य भारतात अनेक ठिकाणी सध्या पाऊस आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावरही झाला असून, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे या भागातील पाणीसाठय़ांमध्ये आणखी भर पडते आहे. पश्चिम घाटक्षेत्रात महाबळेश्वरमध्ये पाऊस सुरूच आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यातील घाटक्षेत्रातील ताम्हिणीत १९० मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. लोणावळा, शिरगावमध्ये १६० ते १७० मिलिमीटर आणि खोपोली, कोयना विभागांत १२० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. चोवीस तासांतील सर्वाधिक पाऊस गोंदियातील सोकोली येथे २५० मिलमीटर नोंदविण्यात आला.

कोयनामधील विसर्ग थांबविण्यात आला आहे. पुणे शहर, जिल्हा आणि धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने खडकवासला धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे.

अंदाज काय? : पावसाच्या पुढील अंदाजानुसार कोकणात सर्वच जिल्ह्यंमध्ये पुढील दोन ते तीन दिवस काही ठिकाणी मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील घाटक्षेत्रात जोरदार, तर सातारा जिल्ह्यंतही घाट विभागांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.