पाणीसाठा साडेदहा टीएमसीवर

पुणे : मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर प्रथमच खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांत दमदार पावसाने हजेरी लावली. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी रात्री आणि सोमवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे चारही धरणांत मिळून पाणीसाठा १०.५१ अब्ज घनफू ट एवढा झाला आहे.

टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पुणे शहराला पाणीपुरवठा के ला जातो. सोमवारी दिवसभरात टेमघर धरणक्षेत्रात ४५ मिलिमीटर, वरसगाव आणि पानशेत धरणांच्या परिसरात अनुक्रमे ४० आणि ३२ मि.मी., तर खडकवासला धरण परिसरात १८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. तर, सोमवारी सकाळपर्यंत टेमघर धरणक्षेत्रात ५० मि.मी., वरसगाव ६० मि.मी., पानशेत ६२ मि.मी. आणि खडकवासला धरण परिसरात सहा मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. त्यामुळे या धरणांमध्ये मिळून एकू ण १०.५१ टीएमसी म्हणजेच ३६.०५ टक्के  पाणीसाठा झाला आहे. या चारही धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा जास्त आहे. गेल्यावर्षी १९ जुलै रोजी ९.३३ टीएमसी (३२.०१ टक्के ) पाणीसाठा होता, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणक्षेत्रात दिवसभरात ६५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्य़ाच्या अन्य धरणांच्या परिसरातही कमी-अधिक प्रमाणात पाऊस हजेरी लावत आहे. त्यामध्ये पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, कळमोडी, वडज, डिंभे, वडिवळे, आंद्रा, गुंजवणी या धरणांचा समावेश आहे.

प्रमुख धरणांमधील पाणीसाठा टीएमसी, कं सात टक्क्यांमध्ये

टेमघर ०.८० (२१.६९), वरसगाव ४.०७ (३१.७७), पानशेत ४.५१ (४२.३६), खडकवासला ०.७३ (३७.१५), पवना ३.२२ (३७.८६), भामा आसखेड ३.२३ (४२.०९), डिंभे ३.२१ (२५.६७), चासकमान १.६६ (२१.९७), गुंजवणी १.५४ (४१.८२), निरा देवघर ४.१२ (३५.१०), भाटघर ६.०८ (२५.८८), वीर ३.८८ (४१.२५) आणि उजनी उणे २.२७ (उणे ४.२३)

धरणक्षेत्रात विलंबाने दमदार पावसाला सुरुवात

गेल्या वर्षी लांबलेला पाऊस आणि पावसाळा संपल्यानंतरही दर महिन्यात झालेला पाऊस, तसेच यंदा मे महिन्यात चक्रीवादळामुळे धरणक्षेत्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे जूनच्या पहिल्या आठवडय़ात शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांमध्ये मिळून  तब्बल ७.८८ टीएमसी पाणीसाठा होता. साधारणपणे मोसमी पाऊस सक्रिय होताना धरणांमध्ये एवढा पाणीसाठा नसतो. गेल्या सात वर्षांत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये एवढा पाणीसाठा नव्हता, असे निरीक्षण जलसंपदा विभागाने नोंदवले होते. मात्र, त्यानंतर धरणक्षेत्रात पावसाने दडी मारली होती. आता विलंबाने का होईना पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे.