पावसाच्या पाण्यासह घरात आलेला गाळ काढण्यात दिवसभराचे श्रम

पुणे : ढगफुटीसदृश कोसळलेल्या मुसळधार पावसाने बुधवारी रात्री नागरिकांची झोप उडाली. रौद्र रूपात रात्रभर कोसळत राहिलेल्या या पावसामुळे नागरिकांनी धास्तीने रात्र जागवून काढली. दुचाकी आणि चारचाकी वाहने सुरक्षित अंतरावर लावण्याची तसेच घरात शिरलेले पावसाचे पाणी आणि पाण्याबरोबर वाहत आलेला गाळ हे स्वच्छ करण्यामध्ये गुरुवारचा दिवस गेला.

बुधवारी दुपारी एक जोरदार सर आली होती. त्यानंतर तिन्हीसांजेपासून पुन्हा सुरू झालेल्या पावसाने जोर धरला. कमी कालावधीत झालेल्या जोरदार पावसाने शहराच्या विविध भागांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाणी साचले होते. अनेक ठिकाणी रस्त्यांनी तळ्याचे रूप धारण केले होते. या पाण्यातून वाहन चालविताना दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडाली. रात्रभर बरसत असलेल्या पावसाने शहरातील ४५ ते ५० ठिकाणी विविध भागातील घरे आणि सोसायटय़ांमध्ये पाणी घुसले. तर, दहा ठिकाणी झाडे कोसळली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य केले.

पावसाचा जोर वाढत असताना नागरिकांना भीतीने ग्रासले होते. एकीकडे वाहने सुरक्षित अंतरावर नेऊन लावण्याची कसरत सुरू असताना घरामध्ये शिरलेले पावसाचे पाणी आणि पाण्याबरोबर वाहत आलेला गाळ दूर करण्याची धडपड सुरू होती. एकाच वेळी विविध स्तरावर लढाई सुरू असताना कुटुंबातील सर्वाची झोप उडाली होती. साऱ्यांच्या चेहऱ्यावर धास्ती आणि साफसफाई करण्याची लगबग सुरू होती.

मध्यवर्ती पेठांसह, सिंहगड रस्ता, हडपसर, येरवडा, विश्रांतवाडी, धानोरी भागाला पावसाचा सर्वाधिक फटका बसला. ताडीवाला रस्ता झोपडपट्टी नदीलगतच्या भागातील घरांमध्ये तसेच कोरेगाव पार्कमधील अनेक बंगल्यांमध्ये रस्त्यावरील पावसाचे पाणी घरात घुसले.

गंज पेठ श्रमदान मारुती मंडळ, सदानंदनगर, अशोक चौक, दगडी नागोबा चौक, नारायण पेठ पोलीस चौकी मागील घरांमध्ये पाणी घुसून नागरिकांच्या संसारोपयोगी वस्तूंचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. शिवाजीनगर येथील दळवी हॉस्पिटलच्या तळघरामध्ये पाणी घुसले होते. पावसाच्या पाण्याने मध्य भागातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते.

दहा ठिकाणी झाडे कोसळली

शहरात पावसासोबत असलेल्या वाऱ्यामुळे दहा ठिकाणी झाडे कोसळण्याचे प्रकार घडले. त्यात कोथरूडमधील डीपी रोडवरील आशिष गार्डनजवळ, रामबाग कॉलनी, सनसिटीतील दौलत नगर, धानोरीतील गोकु ळनगर, शिवाजीनगर गणेशखिंड रस्त्यावरील मफतलाल बंगल्याजवळ, कर्वेनगरमधील प्रतीक्षा मंगल कार्यालय, लुल्लानगर मधील सुखवानी पॅलेस, मंगळवार पेठ मालधक्का चौक, मुंढव्यातील केशवनगर चौक, वडगाव बुद्रुक रेणुकानगरी सोसायटी आणि नवी पेठेतील शास्त्री रस्त्यावर काका हलवाई दुकानजवळ झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या.