16 October 2019

News Flash

उष्णतेची लाट आणि पावसाचीही शक्यता

राज्यात काही ठिकाणी आज वादळासह गारपिटीचा अंदाज

(संग्रहित छायाचित्र)

राज्यात काही ठिकाणी आज वादळासह गारपिटीचा अंदाज

अरबी समुद्रातून सध्या बाष्पाचा पुरवठा होत असल्याने राज्यात ढगाळ हवामानाची स्थिती आहे. मध्य प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे सोमवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस तसेच गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाजही देण्यात आला आहे.

राज्यातील कमी दाबाच्या पट्टय़ाचा परिणाम म्हणून गेल्या चोवीस तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील सातारा, महाबळेश्वर, कोल्हापूर, सोलापूर, पुणे कोकणातील रत्नागिरी आदी ठिकाणी वादळ-वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात गारपीटही झाली. राज्यात अजून दोन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. १५ एप्रिलसह १६ एप्रिललाही विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

राज्यात बहुतांश भागात ढगाळ वातावरण असतानाही उन्हाचा चटता कमी होऊ शकलेला नाही. विदर्भात सध्या सर्वाधिक उष्मा आहे. पुढील काळात त्यात वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४५.० अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ आदी ठिकाणीही तापमानाचा पारा ४३ ते ४५ अंशांच्या आसपास आहे. मराठवाडय़ातही परभणी, नांदेड, बीड आदी ठिकाणी ४२ ते ४३ अंश कमाल तापमान आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, मालेगाव, जळगाव आदी ठिकाणी ४२ ते ४३ अंशांवर तापमानाचा पारा आहे. कोकण विभागात मुंबईत ३३.२ अंश, तर रत्नागिरीत ३५ अंशांवर कमाल तापमान आहे.

नाशिकमध्ये वीज कोसळून तिघांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यत वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाने रविवारी तिघांचा बळी घेतला. दिंडोरी तालुक्यातील मानोरी येथे सायंकाळी क्रिकेट खेळणाऱ्यांवर वीज कोसळून तीन जण ठार झाले. अनिल गवे (३२), सागर गवे (१७), रोहित गायकवाड (१८) अशी त्यांची नावे आहेत.

First Published on April 15, 2019 12:46 am

Web Title: high temperature in maharashtra