हिंदुस्तानी संगीतातील प्रख्यात कलावंत वीणा सहस्त्रबुद्धे यांचे बुधवारी रात्री येथे निधन झाले. त्या ६८ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी आणि नातवंडे आहेत. त्यांची ख्याल व भजन गायकी अत्यंत रसिकप्रिय होती. त्यांचे वडील शंकर श्रीपाद बोडस हे प्रख्यात गायक पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य होते. त्यांच्याकडूनच गायकीचे प्राथमिक धडे वीणाताईंनी गिरविले. त्यानंतर मोठे बंधू काशिनाथ, पं. बलवंतराय भट्ट, पं. वसंत ठक्कर आणि पं. गजाननराव जोशी यांच्याकडे त्यांनी गायनाचे धडे घेतले. त्यामुळे त्यांची गायनशैली ग्वाल्हेर घराण्याची असली तरी जयपूर, किराणा घराण्याचाही प्रभाव त्यांच्या गाण्यावर होता.