हिंजवडी परिसरातील नेहरे गावात रात्री उशिरापर्यंत पार्टी सुरू असलेल्या एका फार्महाउसवर पोलिसांनी छापा टाकून ५० तरुण आणि १२ तरुणींना ताब्यात घेतले. या प्रकरणी फार्महाउसच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तर, तरुण-तरुणींची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना तंबी देऊन सोडून देण्यात आले.
फार्म हाउसचे मालक नीरव अनिल जमदाणी (वय २१, रा. परिहार चौक, औंध)  याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलिसांना त्यांच्या हद्दीतील नेहरे गावातील एका फार्महाउसवर रात्री उशिरापर्यंत तरुण-तरुणी गोंधळ घालीत आहेत, अशी माहिती मिळाली. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास फार्महाउसवर छापा टाकला. त्या ठिकाणाहून ५० तरुण आणि १२ तरुणींना ताब्यात घेण्यात आले. तसेच या ठिकाणी साडेसहा हजार रुपये किमतीचे विदेशी मद्य मिळून आले. ताब्यात घेतलेल्या ५० तरुणांची पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पण, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे या मुलांना समज देऊन सोडून देण्यात आले आहे. या फार्म हाउसच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.  या ठिकाणी ताब्यात घेतलेली मुले ही चांगल्या घरातील असून काही जण या पार्टीसाठी बाहेरच्या राज्यातून आली होती. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एम. पी. कदम हे अधिक तपास करीत आहेत.