नव्या वर्षांमध्ये तब्बल २५ सार्वजनिक सुट्टय़ांमुळे नोकरदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. वर्षभरातील बारापैकी दहा महिन्यांत या सुट्टय़ा शनिवार-रविवारला जोडून आल्यामुळे ज्यांना दुसरा-चौथा शनिवार सुट्टी आहे किंवा ज्यांना पाच दिवसांचा आठवडा आहे अशा सरकारी नोकरदारांसाठी ‘अच्छे दिन’ आले आहेत.
जानेवारीमध्ये २४ तारखेला चौथा शनिवार असून २५ तारखेला रविवारची सुट्टी आहे. तर, २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनाची सुट्टी आहे. फेब्रुवारी आणि जून हे दोन महिने वगळता अन्य नऊ महिन्यांतील सुट्टय़ा या शनिवार-रविवारला जोडून आल्या आहेत. मार्च महिन्यामध्ये ६ तारखेला धूलिवंदनाची सुट्टी ही शनिवार-रविवारला जोडून आली आहे. एप्रिलमध्ये २ तारखेला महावीर जयंतीची, तर ३ तारखेला गुड फ्रायडे हे दोन दिवस झाल्यावर शनिवार-रविवारची सुट्टी आहे. १ मे रोजी शुक्रवार आला असून महाराष्ट्रदिन आणि कामगारदिनाची सुट्टी आल्याने सरकारी नोकरदारांना सलग तीन दिवस सहलीसाठी मिळणार आहेत.
२५ आणि २६ जुलैला शनिवार-रविवारची सुट्टी झाल्यावर २७ तारखेला आषाढी एकादशीची सुट्टी आली आहे. देशाचा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट रोजी शनिवारी आला असून, रविवारची सुट्टी झाल्यावर एक दिवसाची रजा घेतली, तर मंगळवारी १८ ऑगस्ट रोजी आलेला पारशी नववर्षदिन अशी सलग चार दिवस सुट्टी उपभोगता येणार आहे. सप्टेंबरमध्ये १७ तारखेला गणरायाच्या आगमनाची सुट्टी आहे. १८ सप्टेंबर रोजी एक दिवसाची रजा घेतली तर शनिवार-रविवार असे चार दिवस सुट्टीचे लाभणार आहेत. २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती ही शनिवार-रविवारला जोडूनच आली आहे. २२ ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा असून शुक्रवारी २३ ऑक्टोबला रजा घेतली, तर सलग चार दिवस मिळणार आहेत.
नोव्हेंबरमध्ये ११ तारखेला लक्ष्मीपूजन, तर १२ तारखेला पाडव्याची सुट्टी आहे. शुक्रवारी १३ नोव्हेंबर रोजी भाऊबीज असून त्या दिवशी रजा घेतली तर सलग पाच दिवसांची सुट्टी अनुभवता येणार आहे. डिसेंबरमध्ये २४ तारखेला ईद-ए-मिलानची तर २५ डिसेंबरला नाताळची सुट्टी ही शनिवार-रविवारला जोडून आली असल्याने चार दिवस आरामाचे मिळणार आहेत.