राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रात्री १२  वाजता पुणे पोलिस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात उपस्थित राहत नववर्षाचे स्वागत केले. गृहमंत्र्यांनी यावेळी होप २०२१ असे लिहिलेला केप कापला. तसेच पोलीस दलाला नविन वर्षाच्या शुभेच्छा देत त्यांचा उत्साह वाढवला. २०२१ हे वर्ष आशादायी असणार आहे असे गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयातील नियंत्रण कक्षाला देखील भेट दिली. यावेळी त्यांनी स्वतः नियंत्रण कक्षात येणाऱ्या तक्रारींचे निवारण केले. सिंहगड रोड वरील आनंद नगर मधील एका सोसायटी परिसरात मोठ्या आवाजात स्पिकर्स सुरू असल्याची तक्रार एका व्यक्तीने यावेळी दिली. त्यावर अनिल देशमुख यांनी, “तुमची तक्रार बाजूच्या पोलीस स्टेशनला सांगतो” असे म्हणत तक्रारदाराला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.