करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या साडेचार महिन्यांपासून व्यायामशाळा, जिम बंद असल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिम चालकांचा आज (गुरुवार) अखेर संयम सुटला. जिम सुरु करण्याचे आदेश द्यावेत, या मागणीसाठी त्यांनी महापालिकेच्या मेनगेटवर भर पावसात आंदोलन केले. तसेच जिम बंद ठेवून किती रुग्ण कमी झाले? असा सवाल विचारत व्यायाम शाळा लवकरात लवकर सुरू कराव्यात यासाठी जिम चालक, मालक, प्रशिक्षक यांनी अतिरिक्त आयुक्तांना निवेदनही दिले.

जिमवर अनेक जणांचे कुटुंब अवलंबून असून त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होत चालली असल्याने शासनाने महिन्याला दहा हजार रुपये आर्थिक सहाय्य करावे. कर्जाचे हप्ते, जिम भाडं, वीज बिलात सवलत द्यावी, अशा विविध मागण्या घेऊन फटनेस एक्सपर्ट असोसिएशनच्यावतीने महापालिकेच्या गेटवर आंदोलन करण्यात आले.

गेल्या साडेचार महिन्यांपासून करोनाच्या प्रादुर्भावामुळे जिम बंद ठेवण्याचे राज्य शासनाने आदेश काढले. दरम्यान, महाराष्ट्रात बऱ्यापैकी अटी आणि शर्थी लागू करून सर्व व्यवसाय, हॉटेल्स, मॉल्स सुरू करण्यास मुभा दिली आहे. मग, जिमलाच का परवानगी दिली जात नाही? असा प्रश्नही जिम चालकांनी केला आहे.

यावेळी हातात मागण्यांचे फलक घेऊन त्यांनी प्रशासनाला अनेक प्रश्न विचारले आहेत. पाच माहिने जिम बंद ठेवून किती रुग्ण कमी झाले?, जिम बंद ठेवून जिमचं भाडं, कर्जाचे हप्ते, प्रशासन भरणार आहे का? एवढे पैसे कुठून आणायचे? ओपन जिम चालू तर इनडोअर जिम का नाही?, आम्हाला ही परिवार आहे, आमचं घर कसं चालणार?, जिम बंद राहिल्या तर देश कसा फिट राहील? असे अनेक प्रश्न त्यांनी या फलकांच्या माध्यमातून विचारले आहेत.