सीबीएसई, आयसीएससीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यामुळे आता राज्य मंडळाच्या बारावीच्या निकालाबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. जूनच्या पहिल्या आठवडय़ात बारावीचा निकाल लागण्याची शक्यता असल्याचे राज्य मंडळातील सूत्रांनी सांगितले.
सीबीएसई आणि आयसीएससीचे दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर होऊ लागले आहेत. त्यामुळे राज्य मंडळाच्या दहावी, बारावीच्या परीक्षांच्या निकालाबाबत उत्सुकता वाढली आहे. गेल्यावर्षी ३० मे रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला होता. साधारणपणे मे महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ात बारावीचे निकाल राज्य मंडळाकडून जाहीर केले जातात. मात्र, या वर्षी अजूनही राज्य मंडळाकडून निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता असल्याचे राज्यमंडळातील सूत्रांनी सांगितले. याबाबत राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी सांगितले, ‘बारावीच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, ५ जूनपूर्वी निकाल जाहीर होईल. साधारणपणे गेल्यावर्षी ज्यावेळी निकाल जाहीर झाला, त्या दरम्यान निकाल जाहीर होईल.’