पहाटे साडेचारची वेळ.. बोचऱ्या थंडीत एका महिलेचा विव्हळण्याचा आवाज रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या पोलिस व्हॅनमधील कर्मचाऱ्यांनी ऐकला..प्रसवकळा सोसणाऱ्या त्या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.. घोरपडे पेठेतून सुसाट वेगाने निघालेली पोलीस व्हॅन बाजीराव रस्त्यावर असतानाच ती महिला व्हॅनमध्येच प्रसूत झाली. त्यानंतर कमला नेहरू रुग्णालयात डॉक्टरांच्या मदतीने सर्व सोपस्कार पोलिसांनी पार पाडले आणि खाकी वर्दीत दडलेल्या माणुसकीची प्रचिती दिली.
अलका वैभव बालगुडे (वय २६ रा.घोरपडे पेठ) असे सुखरूप प्रसूत झालेल्या महिलेचे नाव आहे. अलका आणि तिचे नवजात बाळ मंगळवार पेठेतील महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात उपचार घेत आहेत. घोरपडे पेठेत अलका हिचे माहेर आहे. ती प्रसूतीसाठी माहेरी आली होती. अलकाला शनिवारी पहाटे प्रसवकळा सुरू झाल्या. अलकासोबत तिची आई होती. आईने अलकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. दोघी घराबाहेर पडल्यानंतर अलकाची आई रिक्षा शोधण्यासाठी पुढे गेली. नेमक्या याचवेळी खडक पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अशोक इप्पर, हवालदार दत्तात्रय रत्नपारखी, नितीन पेठकर, पोलिस मित्र शिरीष शिंदे, नसरूल्ला बागवान हे तेथून गस्त घालत चालले होते.
व्हॅनमधील पोलिस कर्मचाऱ्यांनी अलकाचा आवाज ऐकला आणि त्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. सुसाट वेगाने व्हॅन मंगळवार पेठेतील महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयाच्या दिशेने निघाली. मात्र,बाजीराव रस्त्यावर नूमवि प्रशालेसमोर अलका व्हॅनमध्येच प्रसूत झाली.
प्रसंगावधान राखत व्हॅनमधील पोलिसांनी नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती दिली. नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधला. डॉ. चिंतन राठोड, परिचारिका सविता कांबळे यांनी व्हॅनमध्ये प्रसूती पार पाडली. त्यानंतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ जाधव, गुन्हे शाखेचे निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी पोलिस कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक केले. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या मदतीबद्दल अलका बालगुडे हिने पोलिसांचे मनोमन आभार मानले. पोलिसांच्या रुपाने देवच मदतीला धावून आला अशी भावना तिने व्यक्त केली.