‘नेचर’ नियतकालिकाच्या यादीत प्रथम क्रमांक

‘नेचर’ नियतकालिकाने प्रसिद्ध केलेल्या यादीत देशातील विज्ञान संशोधनात या वर्षी पुण्याच्या ‘आयसर’ या संस्थेचा प्रथम क्रमांक लागला आहे. गेल्या वर्षी संस्था या यादीत चौथ्या क्रमांकावर होती. पुण्यातील ‘आयसर’मध्ये संशोधनास सुरुवात होऊन केवळ ८ वर्षे झाली आहेत.

आयसरमधील प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे संशोधन निबंध जगातील नावाजलेल्या नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले असून त्यांचे संदर्भही जास्त वेळा इतरांकडून घेतले गेले आहेत. ही संस्था ‘आयआयटी’ संस्थांच्या तोडीस तोड असून सध्या आयआयटीलाही ती मागे टाकत आहे. सध्या संस्थेत ६५० विद्यार्थी पाच वर्षांच्या पदवी व पदव्युत्तर (बीएस-एमएस) अभ्यासक्रमात, तर ५०० विद्यार्थी पीएच.डी. अभ्यासक्रमात शिकत आहेत.

अल्पावधीत संशोधनातील सर्वोच्च स्थान प्राप्त होणे ही महत्त्वाची बाब असल्याचे संस्थेचे संचालक के. एन. गणेश यांनी सांगितले. देशातील सहा ‘आयसर’ संस्थांमध्येही पुण्याच्या ‘आयसर’ने सर्वोत्तम स्थान प्राप्त केल्याचेही ते म्हणाले. ‘नेचर’ नियतकालिकाने केलेल्या निवडीबाबत त्यांनी सांगितले की, आमच्याकडील प्राध्यापक उच्चशिक्षित व अध्यापननिपुण आहेत तसेच संशोधन सुविधा अधिक प्रगत आहेत. येथील त्यामुळे संशोधनात संस्थेस प्रथम क्रमांक मिळाला.

गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

‘इन्फोसिस फाउंडेशन’ने ‘आयसर’ संस्थेबरोबर करार केला असून त्यातून आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना संशोधनात्मक विज्ञान शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती व विद्यावृत्ती दिल्या जाणार आहेत. ‘इन्फोसिस’तर्फे ‘आयसर’ला पाच कोटींचा निधी देण्यात आला असून दरवर्षी संस्थेत शिक्षण घेणाऱ्या ५० गरजू विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. या निधीतून ‘बीएस-एमएस’ हा पाच वर्षांचा पदवी अभ्यासक्रम करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना ‘इन्फोसिस फाउंडेशन शिष्यवृत्ती’ व पीएच. डी. पदवी घेणाऱ्यांना ‘इन्फोसिस फाउंडेशन विद्यावृत्ती’ प्रदान करण्यात येणार असून त्यात संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ केले जाईल. याशिवाय पीएच.डी.मध्ये संशोधनात विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांना परिषदांमध्ये भाग घेण्यासाठी प्रवास शिष्यवृत्तीही (ट्रॅव्हल अ‍ॅवॉर्ड) दिली जाणार आहे.