राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान आपल्या वैयक्तिक आयुष्यातला एक किस्सा उपस्थितांना सांगितला. कचरा केल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करेन, अशी धमकीवजा सूचना आपल्याला कन्येनं दिल्याचे सांगितले. ते म्हणाले की, मी एकदा तिच्यासोबत खेळत होतो. त्यावेळी मी नॅपकिन पेपरचा चेंडू तयार करुन तिच्या दिशेने फेकला. यावेळी तिने मला कचरा केला तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करेन, असे म्हटले होते. मुख्यमंत्र्यानी हा किस्सा सांगितल्यानंतर कार्यक्रमात हशा पिकला. पुण्यात रोटरी क्लब ऑफ कोरेगाव पार्क आणि जेटी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बालपणी जडणाऱ्या स्थूलपणाविरोधात उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या मोहिमेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी फडणवीस स्थूलतेविषयी मार्गदर्शन करताना म्हणाले की, लहानपणापासून मी स्थूल होतो. त्यावेळी मला योग्य मार्गदर्शन मिळाले नाही. सध्या लहान मुलांमधील स्थूलतेचे प्रमाण वाढत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लहान मुलांनी मैदानी खेळावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. संगणकाचा अधिक वापर लहान मुलांमध्ये स्थूलपणा वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले.