दोन महिन्यांपूर्वी पिंपळे गुरव बसस्थानकात वाहकाविना पीएमपीएमएलची बस धावल्याची घटना ताजी असतानाच आज (मंगळवार) पिंपरी चिंचवड येथील भोसरी येथे पुन्हा अशीच घटना घडली. सुदैवाने आजच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही वाहनांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भोसरी येथील बीआरटी बस थांब्यावरील बस (एमएच १२ केक्यू ०२१०) चालकाविना उभी होती. बसमध्ये चालक नव्हता, त्याने हँडब्रेकही लावला नव्हता. उतार असल्यामुळे अचानक बस सुसाट पुढे जाऊ लागली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. बस फुटपाथवर चढली. यात एक व्यक्ती थोडक्यात बचावला पण दोन-तीन दुचाकींचे नुकसान झाले.

यापूर्वीही पिंपळे गुरव येथे चालकाविना उभी असलेली बस अचानक धावू लागली होती. ही बस त्यावेळी एका गॅरेजमध्ये घुसली होती. त्यावेळीही दुचाकीचे मोठे नुकसान झाले होते. दोन्ही घटनांत चालकांचा निष्काळजीपणा दिसून आला आहे.