पुणे शहरात आज दिवसभरात ९९३ नवे करोनाबाधित आढळल्याने, शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या १ लाख ४९ हजार ३९९ एवढी झाली आहे. तर आज दिवसभरात ३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ३ हजार ६४७ रुग्णांना करोनामुळे जीव गमवावा लागला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या १ हजार ४२८ रुग्णांची तब्येत ठीक झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत १ लाख ३० हजार ३५३ रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ५४४ नवे करोनाबाधित आढळले असून, २० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, ६९१ जण आज करोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ८० हजार ४८० वर पोहचली असून, यापैकी ६८ हजार ४५३ जण करोनातून बरे झाले आहे. महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३ हजार ४३४ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

देशभरासह राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव अद्याप थांबलेला नसला तरी, करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत मात्र दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आज पुन्हा एकदा राज्यात करोनाबाधितांच्या संख्येपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक दिसून आली. दिवसभरात राज्यात १३ हजार ७०२ नवे करोनाबाधित आढळले तर, १५ हजार ४८ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला. राज्याचा रिकव्हरी रेट ७९.६४ टक्क्यांवर पोहचला आहे.