‘चिंटू’ या हास्यचित्रमालिकेचे सहनिर्माते प्रभाकर वाडेकर यांच्या जन्मदिनानिमित्त ‘चिंटू- मैत्र जीवांचे’ या हास्यचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. वाडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भरवण्यात येणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन ८ ऑगस्टला सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष व व्यंगचित्रकार राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
‘चिंटू’ या चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले या वेळी उपस्थित राहणार आहेत. ‘चिंटू’चे सहनिर्माते चारूहास पंडित यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ‘चिंटू’ ही हास्यचित्रमालिका हिंदी व इंग्रजीत भाषांतरित करून त्याची पुस्तके वाचकांसमोर आणण्याचा, तसेच ‘चिंटू’ची ‘कॉमिक्स’ पुस्तके करण्याचा मनोदयही चारूहास पंडित यांनी व्यक्त केला.
८ ते ११ ऑगस्ट या कालावधीत घोले रस्त्यावरील महापालिकेच्या कला दालनात हे प्रदर्शन होणार आहे. सकाळी १० ते रात्री ८ या वेळात ते सर्वासाठी विनामूल्य खुले राहील. या वेळी लहान मुलांना चिंटूची चित्रे रंगवण्याची संधीही मिळणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 6, 2013 2:45 am