शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या पंचवीस टक्के आरक्षित जागांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठीची मुदत वाढवण्यात आली असून आता ४ एप्रिलपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये यावर्षी पंचवीस टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया प्रायोगिक तत्त्वावर ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. राखीव जागांची प्रवेश प्रक्रिया करण्यासाठी शनिवार (२९ मार्च) मुदत देण्यात आली होती. प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांच्या उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला आवश्यक आहे. मात्र, दिलेल्या मुदतीत या कागदपत्रांची पूर्तता होत नसल्याची तक्रार पालकांनी केली होती. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी पालक आणि विविध स्वयंसेवी संस्थाकडून करण्यात येत होती. त्या पाश्र्वभूमीवर प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. आता ४ एप्रिलपर्यंत पालकांना प्रवेश अर्ज भरता येणार आहेत.