वयाच्या पंचविशीत रचना साठे योग प्रशिक्षक

वयाच्या पंचविसाव्या वर्षी करीअरचा मार्ग ठरवणाऱ्या तरुण मुला-मुलींना मोठय़ा पगाराची नोकरी, त्यातून मिळणारी बढती, परदेशातील संधी आणि त्याबरोबरीने येणारे आकर्षक लाभ यांची भूरळ पडलेली असते. मात्र वयाच्या पंचविशीतच पुण्यातील एका तरुणीने योगविद्येचे शास्त्रोक्त शिक्षण घेऊन योग प्रशिक्षक होण्याचा मार्ग ‘करीअर’ म्हणून निवडला आहे.

रचना साठे असे या तरुणीचे नाव आहे. रचनाने आय. एल. एस. विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी संपादन केली आहे. कायद्याची पदवी पूर्ण केल्यानंतर कॉर्पोरेट जगातल्या नोकरीत प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत असतानाच तिला मदुराई येथील शिवानंद योग आश्रमातील योग प्रशिक्षक अभ्यासक्रमाची माहिती मिळाली. तो करून बघावा या विचारातून रचना मदुराईला गेली आणि परत आली ती योगासने हेच करीअर हा निर्णय घेऊन. शिवानंद योग संस्थेचा टीचर्स ट्रेनिंग कोर्स तसेच अ‍ॅडव्हान्स टीचर्स ट्रेनिंग कोर्स पूर्ण केलेली रचना आता अनेकांना योगविद्येचे धडे देत आहे.

रचना म्हणाली की, इयत्ता सातवी किंवा आठवीत असल्यापासून मी योगासने करत होते. त्याबरोबरीने धावणे, पोहणे हे व्यायामही होतेच. पण योगासने करणे मला विशेष आवडत होते. एल.एल.बी. पूर्ण केल्यानंतर थोडा बदल म्हणून मी मदुराईला शिवानंद योग इन्स्टिटय़ूटचा टीचर्स ट्रेनिंग अभ्यासक्रम करण्यासाठी गेले. तेथून परत आल्यानंतर योगविद्या हेच करीअर हा निर्णय घेतला. सुदैवाने माझ्या घरी फारसा विरोध झाला नाही आणि त्यातून ‘योगा वे पुणे’ ही योग प्रशिक्षण संस्था सुरू झाली. योगाभ्यासातून व्यक्ती म्हणून मी आंतर्बाह्य़ बदलले. मिळालेल्या यशाने हुरळून जाऊ नये किंवा लहानशा अपयशाने खचून जाऊ नये एवढी कणखर झाले. वजन नियंत्रणात आल्याने आरोग्य सुधारले. योगविद्या हे केवळ योगासने करण्यापुरते मर्यादित नाही तर जीवनशैली म्हणून स्वीकारले जावे याची जाणीव झाली. योग प्रशिक्षक म्हणून काम सुरू केल्यानंतर ज्यांना दीर्घकाळ योग शिकवते त्यांच्या व्यक्तिमत्त्वातदेखील सकारात्मक बदल दिसतात. कर्करोगातून बऱ्या झालेल्या मात्र मनाची उमेद हरवून बसलेल्या बासष्ठ वर्षीय महिलेला मी घरी जाऊन योग शिकवते. त्यांच्यामध्ये झालेले बदल स्तिमित करणारे असून त्यामुळे योगविद्येची ताकद मी नव्याने अनुभवली. जागतिक योग दिन म्हणून २१ जून हा दिवस साजरा करण्यातून योगविद्येकडे पाहण्याचा भारतीयांचा दृष्टिकोन बदलला ही बाब अतिशय सकारात्मक असल्याचे रचना म्हणते.