संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांचे परखड मत

गोवंशहत्या बंदीचा निर्णय घेऊन गोरक्षा करण्यामागचा उद्देश कोणत्याही धर्माच्या किंवा समुदायाच्या विरोधात नाही. देशात घडणाऱ्या घटनांना दुर्दैवाने जातीय स्वरूप दिले जात आहे. या विषयाचे राजकारण करताना हा मुद्दा संवेदनशील आणि संघर्षांचा केला जात असून हे सामाजिक पाप आहे, असे परखड मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी शनिवारी केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांताचा प्रथम वर्ष आणि महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या राज्यांच्या मिळून पश्चिम क्षेत्राच्या द्वितीय वर्ष वर्गाच्या समारोप कार्यक्रमात भैय्याजी जोशी बोलत होते. ‘अंतर्नाद’ मासिकाचे संपादक भानू काळे, संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नाना जाधव, द्वितीय वर्ग सर्वाधिकारी अविनाश बडगे आणि प्रथम वर्ष वर्गाधिकारी विलास चौथाई या वेळी उपस्थित होते.

गाय ही प्राचीन काळापासून भारताच्या कृषी आणि आर्थिक विकासाचे प्रतीक आहे. हिंदूुत्वाचा विचार म्हणजे संकुचित, प्रतिगामी आणि विज्ञानाला विरोध अशी प्रतिमा पुरोगाम्यांनी करून ठेवली आहे. मात्र, आता गोरक्षेच्या विषयावर राजकारण होत आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे, असे सांगून जोशी यांनी संघाचा विश्वास संघर्षांपेक्षा संवाद आणि समन्वय यावर असून चर्चेच्या माध्यमातून सर्व प्रश्न सोडविले जातात, अशी आग्रही भूमिका मांडली.

जोशी म्हणाले, समाजजीवन शिस्तबद्ध आणि शोषणमुक्त व्हावे या उद्देशातून देशासाठी उपयुक्त व्यक्तींची घडवणूक करणे हे संघाचे कार्य आहे. हिंदूुत्वाच्या चिंतनामध्ये विश्वकल्याणाचा आणि विकासाचा मार्ग प्रशस्त करणारा विचार आहे. प्राचीन काळाचे चिंतन हा संघाचा विचार आहे.

या विचारांपासून दूर गेल्यामुळेच देशाची अधोगती झाली. समाजातील दोष दूर करण्यासाठी राजकीय नेते आणि समाजसुधारकांनी आवाहन केले. संघानेही हिंदूू समाज हेच आपले कार्यक्षेत्र मानले असून गेली ९० वर्षे संघ यासाठी कार्यरत आहे.

राष्ट्रभक्ती आणि धर्म अशा मूल्यांचा होत असलेला ऱ्हास वेदनादायी असून ही मूल्ये राष्ट्रउभारणीसाठी आवश्यक आहेत, असे सांगून काळे यांनी संघाच्या शिस्तबद्ध आयोजनाची प्रशंसा केली. शिस्तबद्ध आणि व्यक्तिनिर्माणाचे काम करणाऱ्या उपक्रमांतून परदेशातही भारताची प्रतिमा उजळेल, अशी आशा व्यक्त करतानाच वैचारिक अस्पृश्यता पाळत नसल्याने प्रथमच संघाच्या कार्यक्रमात आलो, असेही काळे यांनी सांगितले.

नेत्रदीपक प्रात्यक्षिके

प्रथम वर्षांच्या २६९ आणि द्वितीय वर्षांच्या ४५० अशा ७१९ प्रशिक्षणार्थी स्वयंसेवकांनी नेत्रदीपक प्रात्यक्षिके सादर केली. गीतरामायणातील ‘सेतू बांधा रे सागरी’ या गीतावर आकर्षक लेझीम प्रात्यक्षिक, योगासने, सूर्यनमस्कार आणि दंडयुद्धाचे सादरीकरण, कवायत, संचलन आणि घोषवादन याची प्रात्यक्षिके सादर होताच टाळ्यांचा कडकडाट झाला. महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, अमर साबळे, आमदार मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर, डॉ. संप्रसाद विनोद आणि उद्योजक नरेश मित्तल या वेळी उपस्थित होते.